Uddhav Thackeray at Delhi Jantar Mantar Protest : उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतरमंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आपण या आंदोलन करणाऱ्या मुलांसोबत असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतरमंतर इथे आंदोलन करणाऱ्या मुलांची भेट घेतली. 'आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत, त्यांच्यासोबत बोलण्यात सरकारला कमीपणा का वाटतो आहे? जे तुमच्या दारात आले आहेत, जे तुमच्याकडून काही अपेक्षा बाळगून आहेत, त्यांच्यावर तुम्हा लाठ्या चालवता, महिला, मुलींवर असभ्यपणे अत्याचार केले गेले, एका मुलीचे कपडे फाडले गेले, ही कोणती हिंदू संस्कृती आहे. ही हिंदू संस्कृती नाही. ही रावण संस्कृती आहे', अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी २० जुलै रोजी आंदोलन तरुणांवर झालेल्या लाठीचार्जनंतर सरकारवर टीका केली आहे.
सरकारला आलेली ही मस्ती आहे - उद्धव ठाकरे
केंद्र सरकार चर्चेसाठी तयार आहे, मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही असं सरकारकडून सांगितलं जात आहे. या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'ही मस्ती आहे, या मस्तीच्या विरोधात देश पेटलेला आहे. आता लोकांना रस्त्यावर उतरुन व्यक्त होयचं आहे. त्यांना यापासून अडवू नये. हा अचानक उफाळून आलेला असंतोष नाहीये, हा १२ वर्षात साठलेला असंतोष बाहेर येत आहे, तो बाहेर येऊ द्या.'

मुलांशी बोलण्यात कसला कमीपणा? उद्धव ठाकरेंचा सवाल
'मी या सर्वांच्या मागे पहिल्या दिवसापासून समर्थन देण्यासाठी आहे. तरुण हे आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यांचं भविष्य चिरडून टाकणार असाल, तर लोक ऐकणार नाही. ज्यावेळी अशा तरुणांना तुम्ही झुरळ म्हणता तेव्हा हे सहनशिलतेच्या पलिकडे आहे. या मुलांना कोणीतरी आधार देण्याची गरज आहे. आज त्यांना जर आधार दिला, तर ते देशाचे भावी आधारस्तंभ, देश वाचवू शकतील. पण आज या आधारस्तंभाला तुम्ही तोडून-मोडून टाकलं, हुकूमशाही लादणार असाल, तर ही तरुणाई गप्प बसणार नाही. तसंच लोकशाही जर आपण मानत असू आणि ती असेल, तर त्यांच्याशी जाऊन बोलण्यात तुम्हाला कमीपणा कसला वाटतो आहे. हा कालचा आंदोलनाचा पहिला दिवस नव्हता. हा या आंदोलनाचा २५वा दिवस असेल. त्याआधीही अभिजित दीपके आणि इतर तरुण इथे दिल्लीत येऊन गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत जर चर्चा केली गेली असती, तर हा विषय सुटला असता'.
'मुंबईत आम्ही जे आंदोलन केलं त्यानंतर आंदोलकांना त्यांची नावं, पत्ते विचारुन त्यांना डिजीटल नोटीस पाठवण्यात आली. डिजीटल नोटीस तुम्ही आंदोलकांना का पाठवता, जो विषय पेटलेला आहे तो विषय आधी सोडवा. या देशामध्ये अन्यायाविरोधात आवाज उठवायचा नाही. आवाज उठवला तर, ते चिरडून काढणार, ही लोकशाही देश मान्य करणार नाही. आता सर्वांनी तुझं-माझं करण्यापेक्षा हे आपलं असं समजून मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मी या मुलांसोबत आहे. ही मुलं पाहून अजूनही देशात अन्यायाविरोधात लढण्याची चीड जीवंत आहे, असं वाटतं'. अशा भाषेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधत आपण या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे.


