Manoj Jarange Patil at Delhi Protest Jantar Mantar : मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत आंदोलनात विद्यार्थ्यांना तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. मुलांवर हल्ला झाला, तर माज उतरवल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

नवी दिल्ली : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीतील जंतरमंतर इथे अभिजित दीपकेसह आंदोलक विद्यार्थ्यांना आपण तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. 'तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय कोणीही मागे हटणार नाही, हे सरकार प्रत्येक गोरगरिबांच्या लेकरांवर जाणूनबुजून अन्याय करतं, जर यापुढच्या काळात सरकारकडून मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तर यांचं फिरणं बंद होईल, त्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही', अशा शब्दांत त्यांनी सरकारला खडसावलं आहे.

जंतरमंतर सोडू नका - जरांगे पाटील यांचा आंदोलकांना सल्ला

'जंतरमंतरची जागा आंदोलनासाठी आहे. या ठिकाणी शांततेत आंदोलन करण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच ठिकाणाहून शांततेत तिथेच बसून राहावं, संसदेकडे जाऊ नये, कारण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न होईल. शांततेच्या आंदोलनात ताकद आहे, जंतरमंतर सोडू नका', असा सल्ला जरांगे पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिला आहे.

इथून पुढे हल्ला केला तर माज उतरवणार - मनोज जरांगे

पुढे ते म्हणाले, 'देशभरातील गोरगरिबांच्या लेकरांवर दिल्लीत अन्याय होत आहे. कुठेही न्याय मिळाला नाही, तर आपण न्याय मागण्यासाठी राजधानीत येतो, इथे हे विद्यार्थी न्याय मागण्यासाठी आले आहेत. आंदोलनासाठी बसलेल्या अभिजित, सोनम वांगचुक यांना साथ दिली पाहिजे, सरकारने विद्यार्थ्यांवर क्रूरपणे हल्ला केला आहे. तर आपण मदतीला का जायचं नाही? आपणचं निवडून दिलेल्या लोकांना माज आला, त्यांना जाणीव नसेल, तर त्यांना ती करू दिली पाहिजे की तुम्ही आमच्या जीवावर आहात, तुम्हाला आम्ही पाडू शकतो, गावागावात फिरू देणार नाही. इथून पुढे हल्ला झाला, तर भाजपच्या मंत्र्यांना राज्यासह देशभरात फिरता येणार नाही, अशी भयानक स्थिती होऊ शकते. आम्ही येणार, साथ देणार आणि इथून पुढे हल्ला केला तर माजही उतरवणार', अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

सत्तेची मस्ती, तुम्हाला पुन्हा सत्तेवर कसे येऊ देतील?

'लेकरं न्यायासाठी, भविष्यासाठी लढत आहेत. भविष्यासाठी ही मुलं भांडत आहेत. तुमचं राजकारण जळू द्या, राजकारण तुम्हीच करा, सत्ताही तुम्हीच भोगा, मुलं न्यायासाठी लढत असताना त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला केला गेला, तर देशातील लोकांनी शांत बसलं नाही पाहिजे. पक्ष कोणताही असो, पण अशाप्रकारे न्याय मागताना हल्ला होत असेल, तर मुलं, देशभरातील लोकांनी घरी का बसावं, का वाट पाहावी. माज आणि मस्ती असते, सत्तेची मस्ती भयानक असते, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, हेच लोक त्यांना पाडणार आहे. मोदी जबाबदार आहेत या देशात, त्यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे, विचार केला पाहिजे. न्यायासाठी विद्यार्थ्यांना मार खावा लागतो आहे. हे विद्यार्थी या देशाचं भविष्य आहेत, त्यांनाच तुम्ही पायाखाली तुडवणार, हे तुम्हाला पुन्हा सत्तेवर कसे येऊ देतील?' असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.