आज शुक्रवारी अनिल अंबानी यांना लाचखोरी आणि कर्ज घोटाळ्याच्या चौकशीअंती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ५ ऑगस्ट रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर लाचखोरी, आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदेशीर कर्ज वळविण्याच्या आरोपांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तपास सुरू केला आहे. या चौकशीअंती ईडीने अनिल अंबानी यांना समन्स बजावत ५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी हजर झाल्यानंतर त्यांचा जबाब मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत नोंदवण्यात येणार आहे. अंबानी यांच्या विविध समूह कंपन्यांनी १०,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग घेतल्याच्या आरोपांवर ही कारवाई सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ ते २०१९ या कालावधीत येस बँकेकडून अंबानी यांच्या समूह कंपन्यांना दिलेल्या सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाचे कथितपणे "वळविण्यात" आले होते. या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांची चौकशी सध्या प्राधान्याने केली जात आहे. या प्रकरणात वित्तीय संस्थांचा गैरवापर झाल्याचा संशय ईडीला आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय तपास यंत्रणांनी देशभरात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. मुंबईतील तब्बल ३५ हून अधिक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या तपासात ५० कंपन्या आणि २५ व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. हे संपूर्ण प्रकरण दिल्लीस्थित ईडी युनिटकडून हाताळले जात आहे.
ईडीच्या तपासाचा केंद्रबिंदू म्हणजे येस बँकेने दिलेली कर्जे. २०१७ ते २०१९ दरम्यान अंबानी समूहातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, या रकमा खऱ्या हेतूसाठी न वापरता इतरत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे. ही कर्जरक्कम कोणत्या मार्गाने वळवली गेली, याचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
या कारवाईनंतर रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांनी स्टॉक एक्सचेंजला अधिकृत स्पष्टीकरण पत्र सादर केले आहे. त्यांनी सांगितले की, चौकशीला पूर्ण सहकार्य केले जात असून कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही.
अनिल अंबानी यांच्या आर्थिक साम्राज्यावर या चौकशीमुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ईडीची पुढील चौकशी आणि अंबानींचे जबाब यावरच या प्रकरणाचा पुढील वेग ठरणार आहे. ५ ऑगस्ट रोजी ते ईडीसमोर हजर राहतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


