Mumbai : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मंत्रालयाजवळ कार्यालयासाठी देण्यात आलेली जागा आता फडणवीस सरकारने परत घेतली आहे. 

Mumbai :  एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जनता दल सेक्युलर पक्षाच्या मंत्रालयाजवळील कार्यालयाची 909 चौ.फूट जागा प्रहार जनशक्ती पक्षाला दिली होती. यामध्ये 200 चौ.फूट जागा JDU कडे ठेवून उर्वरित 700 चौ.फूट जागा बच्चू कडू यांच्या पक्षासाठी देण्यात आली होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द केला** असून, संपूर्ण जागा पुन्हा जनता दल सेक्युलरला देण्यात आली आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलाचा निर्णय

या निर्णयामागे राजकीय पार्श्वभूमीचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. बिहारमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने आपला मित्र पक्ष असलेल्या जनता दल सेक्युलरला (JDU) पुन्हा संपूर्ण कार्यालयाची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीला मोठा धक्का बसला आहे.तर एकनाथ शिंदे यांना बंडाच्या काळात साथ देणारे बच्चू कडू हे महायुतीतील महत्त्वाचे सहयोगी मानले जातात. मात्र त्यांच्याच पक्षासाठी दिलेली जागा आता परत घेतल्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. या निर्णयानंतर बच्चू कडूंच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

“कोणतीही योजना बंद नाही”- मुख्यमंत्री फडणवीस

दरम्यान, शिंदे सरकारच्या योजनांना थांबवण्यात आले अशा आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यावर मोठा आर्थिक भार आहे, पण फ्लॅगशिप योजना आम्ही थांबवलेल्या नाहीत.”

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ही योजना देखील सध्या थांबवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील शाळांच्या आधुनिकीकरणासाठी ही योजना ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आली होती. लाखो रुपयांची पारितोषिके आणि राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. मात्र आता आर्थिक मर्यादा आणि निधीअभावी या योजनेचा पुरवठा थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बंद झालेल्या योजना

गेल्या काही महिन्यांत शिंदे सरकारच्या अनेक योजना थांबवण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये ‘आनंदाचा शिधा’, ‘एक राज्य एक गणवेश’, ‘स्वच्छता मॉनिटर’, आणि ‘तीर्थदर्शन योजना’ यांचा समावेश आहे. यामुळे फडणवीस आणि शिंदे गटातील *नीतिगत मतभेद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.