सार

मुंबईतील एलिफंटा परिसरात एका प्रवासी बोटीच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण बेपत्ता आहेत. ८० प्रवाशांपैकी ७७ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असून, अधिकाऱ्यांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

मुंबईतील एलिफंटा परिसरात आज सायंकाळी एक मोठा अपघात घडला आहे, ज्यात एक प्रवासी बोट बुडली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बोटीमध्ये एकूण ८० प्रवासी होते, त्यातले ७७ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. तसेच आठ जण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचावकार्याची माहिती घेतली आणि त्यावर लक्ष ठेवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून बचावकार्याची माहिती घेतली. त्यांनी नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.

एलिफंटा फेरीबोट दुर्घटनेची माहिती मिळताच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशी देखील संवाद साधून माहिती घेतली.

या दुर्घटनेनंतर शेकापचे नेते जयंत पाटील घटनास्थळी पोहचले. त्यांनी सांगितले की, नौदलाच्या बोटीच्या धडकेमुळे बोट पाण्यात बुडली आहे. अपघात कसा झाला हे चौकशीतून स्पष्ट होईल, मात्र त्याआधी बोटीमधील प्रवाशांना वाचवणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, नौदलाने त्यांच्या बोटीने धडक दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.