Mumbai BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर ठाकरे गटात अंतर्गत नाराजी समोर आली आहे. 65 नगरसेवक निवडून आलेल्या ठाकरे गटात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा गटनेतेपद देण्यात आले आहे.
Mumbai BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपताच ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. गटनेतेपदासह पक्षातील महत्त्वाची जबाबदारी पुन्हा एकदा वरळी विधानसभा मतदारसंघातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडे देण्यात आल्याने ठाकरे गटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Mumbai BMC Election 2026)
गटनेतेपदावरून ठाकरे गटात असंतोष
ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आल्याने हा गट भाजपनंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, नगरसेवकांची गटनोंदणी करताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेच गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या निर्णयावरून पक्षांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा आरोप
ठाकरे गटात मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव यांसारखी मातब्बर आणि अनुभवी मंडळी निवडून आली असताना त्यांना डावलून किशोरी पेडणेकर यांना संधी दिल्याने अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक नाराज असल्याची माहिती आहे.
किशोरी पेडणेकरांचा वादग्रस्त प्रवास
तडफदार आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या किशोरी पेडणेकर यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे. मात्र, कोरोना काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर त्या शिवसेना सोडू शकतात, अशी चर्चाही मध्यंतरी सुरू होती. यामुळेच यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती. एबी फॉर्मसाठीही त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली होती.
वरळीला जास्त प्राधान्य? शिवसैनिकांचा सवाल
वरळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेतील दोन आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस्ट समिती अध्यक्ष आणि अनेक ज्येष्ठ नगरसेवकांची मोठी फौज आहे. त्यामुळे ठाकरे गटातील बहुतांश महत्त्वाची पदे वरळी विधानसभेलाच का दिली जातात, असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.
उद्धव ठाकरेंपुढे नाराजी दूर करण्याचे आव्हान
महानगरपालिका निवडणुकीनंतर वाढलेली ही अंतर्गत नाराजी उद्धव ठाकरे कशी दूर करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटातील ही धुसफूस पुढील काळात पक्षासाठी अडचणीची ठरणार का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.


