Mumbai-Ahmedabad Bullet Train : बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाच्या बांधकामात वायू प्रदूषण नियमभंग झाल्याने मुंबई महापालिकेने काम तात्काळ बंद केले आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे–कुर्ला संकुल (बीकेसी) येथील स्थानकाच्या बांधकामात वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने संबंधित यंत्रणेला काम तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावली असून नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास पुढील कडक कारवाईचा इशाराही दिला आहे.
बीकेसीतील बांधकामामुळे वाढले प्रदूषण
बीकेसी परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे धूळ आणि वायू प्रदूषण वाढल्याच्या नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पालिकेने केलेल्या तपासणीत आवश्यक धूळ नियंत्रण उपाययोजना राबवण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट झाले. पाण्याचा फवारा, आच्छादन (कव्हरिंग) आणि पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी न केल्याने महापालिकेने ही कारवाई केल्याचे सांगितले आहे.
सुधारणा झाल्याशिवाय काम सुरू नाही
महापालिकेने संबंधित यंत्रणेला तात्काळ आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. धूळ नियंत्रणासाठी योग्य उपाय राबवून त्याची पूर्तता झाल्याशिवाय काम पुन्हा सुरू करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. नियमांचे पालन न झाल्यास आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
समृद्धी महामार्गावर वाहतूक तात्पुरती बंद
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर 27 ते 29 डिसेंबरदरम्यान विविध टप्प्यांत वाहतूक तात्पुरती बंद राहणार आहे. “हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम” अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत करण्यात येणार आहे.
कुठे आणि कधी वाहतूक बंद राहणार?
हे काम पाच टप्प्यांत होणार असून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे ते चांदुर रेल्वे दरम्यान संबंधित कॉरिडोरवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल.
- कि.मी. 104+080, नगर गावंडी (मुंबई कॉरिडॉर): 27 डिसेंबर 2025, दुपारी 2.00–4.00
- कि.मी. 105+050, नगर गावंडी (मुंबई कॉरिडॉर): 27 डिसेंबर 2025, दुपारी 2.00–4.00
- कि.मी. 105+065, नगर गावंडी (नागपूर कॉरिडॉर): 28 डिसेंबर 2025, दुपारी 2.00–4.00
- कि.मी. 120+300, तिटवा (नागपूर कॉरिडॉर): 29 डिसेंबर 2025, सकाळी 11.00–1.00
- कि.मी. 120+300, तिटवा (मुंबई कॉरिडॉर): 29 डिसेंबर 2025, दुपारी 3.00–5.00


