- Home
- Mumbai
- Mumbai Local Alert : सुट्टीत प्रवासाचा प्लॅन करताय? पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा मेगाब्लॉक, 317 लोकल रद्द
Mumbai Local Alert : सुट्टीत प्रवासाचा प्लॅन करताय? पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा मेगाब्लॉक, 317 लोकल रद्द
Mumbai Local Megablock : पश्चिम रेल्वेने कांदिवली ते बोरिवली दरम्यान 5 व्या व 6 व्या मार्गिकेवरील कामांसाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला. याचा सर्वाधिक परिणाम 26 आणि 27 डिसेंबरला होणार असून या दोन दिवसांत 317 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा मेगाब्लॉक
मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सावध करणारी बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना पुढील काही दिवस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवरील कामांसाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून, त्याचा सर्वाधिक फटका 26 आणि 27 डिसेंबर रोजी बसणार आहे. या दोन दिवसांत पश्चिम रेल्वेवरील एकूण 317 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
26–27 डिसेंबरला प्रवाशांची कसोटी
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, 26 व 27 डिसेंबर रोजी रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा प्रभावित राहणार आहे. या कालावधीत 317 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, शनिवारी (27 डिसेंबर) एकट्या दिवशीच 277 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे वीकेंडला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
18 जानेवारीपर्यंत चालणार मेगाब्लॉक
हा मेगाब्लॉक 18 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत कांदिवली–बोरिवली दरम्यान
ट्रॅक दुरुस्ती
सिग्नलिंग प्रणालीतील सुधारणा
इतर तांत्रिक व संरचनात्मक कामे
केली जाणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
काही लोकल फक्त गोरेगावपर्यंत
मेगाब्लॉकमुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होणार आहे.
काही लोकल गाड्या फक्त गोरेगावपर्यंतच धावणार
काही गाड्यांचे मार्ग बदलले जाणार
तर काही लोकल उशिराने धावण्याची शक्यता आहे
याचा फटका विशेषतः नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना पश्चिम रेल्वेचे आवाहन
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, मेगाब्लॉकदरम्यान रद्द किंवा बदललेल्या लोकल सेवांची माहिती अधिकृत वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा सोशल मीडिया हँडल्सवरून तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरून अनावश्यक त्रास टाळता येईल.

