लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परतताना दोन तरुणांना बसने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
मुंबई : मुंबईत आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) वरील पवई आयआयटीजवळ (IIT Powai) दोन तरुण बेस्ट बसखाली चिरडले गेले. या घटनेत देवांश पटेल (वय 22, रा. जोगेश्वरी) याचा जागीच मृत्यू झाला, तर स्वप्नील विश्वकर्मा (वय 22) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघेही लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला, ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
अपघातानंतर परिसरात तातडीने खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या अपघाताचा तपास सुरू असून बसचालकाची चूक की अन्य काही कारण, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपघातानंतर काही काळ JVLR वर वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तत्परतेने ती सुरळीत केली. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, लालबाग–परळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लालबाग गणेशोत्सव मंडपाजवळ एका दुचाकीस्वाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर परळ भागात दोन वेगवेगळ्या अपघातांत पादचारी गंभीर जखमी झाले होते. गणेशोत्सवाच्या काळातील मोठ्या गर्दीमुळे आणि वाढत्या वाहतुकीच्या दाबामुळे अपघातांची मालिका सुरु असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी अधिक पोलिस बंदोबस्त, कठोर वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि रस्ते सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. विशेषतः लालबाग आणि परळसारख्या गर्दीच्या भागात रस्त्यांची दुरुस्ती, पार्किंग नियंत्रण आणि वाहतुकीवर अधिक देखरेख आवश्यक असल्याचं अधोरेखित होत आहे.


