Mumbai Accident : मुंबईच्या वरळी कोस्टल रोडवर सोमवारी रात्री उशिरा इर्टिका कारचा भीषण अपघात झाला. कार डिवायडर तोडून 30 फूट खोल समुद्रात पडली. सुदैवाने चालकाचा जीव वाचला.
Mumbai Accident : मुंबईतील वरळी कोस्टल रोडवर सोमवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा एक धक्कादायक अपघात घडला. इर्टिका गाडीचा वेग इतका जबरदस्त होता की ती डिवायडर तोडून सुमारे 30 फूट खोल समुद्रात पडली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सुरक्षा जवानांच्या तत्परतेमुळे चालकाचे प्राण वाचले
गस्तीवरील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी घटनास्थळी विलक्षण धैर्य दाखवत चालकाला वाचवले. 28 वर्षीय फ्रशोगर दरायुश बत्तीवाला असे या तरुणाचे नाव असून, तो किरकोळ जखमी झाला आहे. वरळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर कार समुद्राच्या तळाशी गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, चालक महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने वेगात गाडी चालवत होता. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट डिवायडरवर आदळली आणि पाण्यात कोसळली. गस्तीवरील जवानांनी तत्काळ कारवाई करत चालकाला बाहेर काढले. पोलिसांनी चालकाने मद्यप्राशन केले असण्याची शक्यता वर्तवली असून तपास सुरू आहे.
पूर्वीही कोस्टल रोडवर अपघाताची पुनरावृत्ती
यापूर्वी, 9 सप्टेंबर 2025 रोजी वरळी सी-लिंकवर आणखी एक भीषण अपघात झाला होता. त्या घटनेत एका पोलीस हवालदाराचा जागेवरच मृत्यू झाला होता. सागरी किनारा मार्ग आणि वरळी सी-लिंकच्या जोडणीस्थळी ही दुर्घटना घडली होती. एका भरधाव कारने व्हीआयपी बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांना धडक दिली होती. दत्तात्रय कुंभार असे मृत हवालदाराचे नाव असून, एक महिला पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाली होती.
