जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये मराठा-कुणबी एक मान्यता, विविध गॅझेटियरची अंमलबजावणी, कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांचा समावेश, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि कायदेशीर आरक्षणाचा समावेश आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, वातावरण तणावपूर्ण बनलं आहे.
अमित शाह यांचा मुंबई दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील उपस्थित होते. त्यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 1 तास बैठक झाली.
बैठकीत काय चर्चा झाली?
या बैठकीत प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यावर उपाययोजना यावर चर्चा झाली. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मनोज जरांगे यांची मुख्य मागणी आहे. या मागणीवर तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. तसेच, आगामी महानगरपालिका निवडणुका यावरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
1. मराठा-कुणबी एक आहेत, याची अंमलबजावणी व्हावी.
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करावा, तसेच सातारा आणि बॉम्बे गॅझेटियरही लागू करावेत.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे-सोयरे देखील पोटजातीमध्ये धरावेत.
4. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.
5. समाजाला कायद्यात बसणारं आरक्षण द्यावं.


