मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून, त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जरांगे म्हणाले की, राज ठाकरे हे मानाला भुकेलेले पोरगे आहेत आणि फडणवीस चहा पिऊन गेले की पक्ष बर्बाद झाला तरी त्यांना चालते.
मुंबई: मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांनी आपण अजून कडक उपोषण करणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते काय म्हटले ते आपण जाणून घेऊयात.
मनोज जरांगे काय म्हणाले?
मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे की, राज्यातील समाजाचं म्हणणं आहे की दोन्ही भाऊ चांगले आहेत, ठाकरे ब्रँड चालला आहे. विनाकारण मराठ्याच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का? ११ ते १३ आमदार निवडून दिले पळून गेले, त्यानंतर आमच्या मराठवाड्यात का आला आम्ही विचारलं का? पुण्यात का आला? नाशिक सासरवाडी आहे, का पन्नासवेळा येता, आम्ही विचारलं का? लोकसभेला गेम केला त्याच फडणवीसने, विधानसभेला त्यानीच तुझ पोरगं पाडलं. तरी तू त्याचे द्रोण वाढतो, राज ठाकरे हे मानाला भुकाल्यालं पोरगं आहे, फडणवीस चहा पिऊन गेले की पक्ष बर्बात झाला तरी त्याला चालतो, आमच्याकडे गावात याला कुचक्या कानाचं बोलतात.
पुढं जरांगे म्हणतात की, आमची मागणी संविधानाला धरून आहे. मराठा आणि कुणबी एक आहे, याचा जवळपास ५८ लाख लोकांचा अहवाल आहे. गॅझिटियरमध्ये गावनिहाय, तालुकानिहाय आणि जिल्हानिहाय माहिती देण्यात आली आहे. मराठवाड्यातील सर्व मराठे हे कुणबी आहेत. कुणबीची पोटजात आणि उपजात म्हणून घेता येति त्यांना फक्त त्यांना द्यायचं आहे. मराठे आता झोपायला येणार नाहीत.
शनिवार आणि रविवारची वाट न पाहता ते यायला लागलेत. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा म्हणणं आहे की आमची मागणी अवैध आहे, आधी १८० जाती घातल्या होत्या मग ३५०-४०० पोटजाती ओबीसी आरक्षणात घातलेल्या अवैध असायला हव्यात. मंडल कमिशनने १४ टक्के आरक्षण दिलं होतं ते आता ३० टक्के झालं. वरचं १६ टक्के अवैध असायला हवे, ५० च्या वरचं ५२ टक्के कसं झालं त्यापण उडवायला हव्या. मनोज जरांगे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे.
