मालाडमध्ये रविवारी रात्री कारने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत महिला वकीलाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाडमध्ये रविवारी रात्री भीषण रस्ता अपघात झाला. एस. व्ही. रोड आणि मामलेदार वाडी रोड जंक्शन परिसरात झालेल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले. यामध्ये प्रियांका मयंक सत्रा या महिला वकिलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आणखी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातानंतर पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारने तीन रिक्षा आणि दुचाकीला दिली धडक

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे 8 वाजता मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस. व्ही. रोड-मामलेदार वाडी रोड जंक्शन येथे हा अपघात झाला. एमजी विंडसर (MH 02 GJ 2722) या कारने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या धडकेत दुचाकीस्वारासह रिक्षांमधील प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिला वकील प्रियांका सत्रा यांचा मृत्यू झाला.

70 वर्षीय कारचालक पोलिसांच्या ताब्यात

या अपघातानंतर पोलिसांनी कारचालक कृष्णा शांताराम चमनकर (वय 70) याला ताब्यात घेतले. त्याला शताब्दी रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती आहे.

मालाड पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1469/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील कलम 106(1), 281, 125(A)(B) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत अपघातांच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान, रविवारीच मुंबईतील वांद्रे परिसरात भरधाव कारच्या धडकेत आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती.