मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्यातील गुप्त बैठकीनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काही वादग्रस्त मंत्र्यांना हकालपट्टी मिळू शकते, तर नवीन चेहरे मंत्रिमंडळात येऊ शकतात.
मुंबई : राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या एका गुप्त बैठकीने चर्चांना नवेच वळण दिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली आणि त्यामुळे महायुती सरकारमध्ये मोठ्या घडामोडी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
महत्त्वाच्या मंत्र्यांची हकालपट्टी?
राज्य सरकार स्थापनेला आता सहा महिने उलटले असतानाच अनेक मंत्री वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे.
शहा-फडणवीस यांची भेट, काय घडलं या चर्चेत?
फडणवीस आणि शहा यांच्यातील ही चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली. या चर्चेचे केंद्रबिंदू होते. मंत्र्यांची कामगिरी, वादग्रस्त वर्तन आणि सार्वजनिक प्रतिमा. त्याचबरोबर, फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऊर्जा मंत्री मनोहर खट्टर यांच्याशी देखील संवाद साधला.
कोणते मंत्री अडचणीत?
1. संजय शिरसाट (शिवसेना)
व्हिडिओ क्लिपमधून बेडरूममध्ये पैशांनी भरलेली बॅग समोर आली.
मुलाच्या हॉटेलसाठी नियमांत बदल केल्याचा आरोप.
2. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
विधान परिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचे व्हिडीओ समोर.
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत.
3. संजय राठोड, भरत गोगावले, योगेश कदम (शिवसेना)
यांच्यावर कार्यक्षमतेबाबत नाराजी.
4. नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
वादग्रस्त कारभार आणि अपयशी प्रशासन.
5. गिरीश महाजन (भाजप)
मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय असले तरीही संभाव्य फेरबदलात त्यांचे नाव चर्चेत.
नवीन चेहरे मंत्रिमंडळात?
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असलेले नार्वेकर मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या जागी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. राहुल नार्वेकर म्हणाले, "मी विधानसभा अध्यक्ष म्हणून समाधानकारक काम केलं आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो मी स्वीकारेन."
राजकीय चित्र बदलण्याच्या मार्गावर?
ही 20 मिनिटांची भेट राजकीय घडामोडींचं संकेतक ठरू शकते. येत्या काही दिवसांत महायुती सरकारमध्ये खळबळजनक निर्णय घेतले जाऊ शकतात. अनेकांचे पत्ते कट होणार आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


