सणासुदीच्या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात मोठी कारवाई केली आहे. यात तब्बल १.२० कोटी रुपयांचे ५० टनांहून अधिक अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून, ३० दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत.

मुंबई : सणासुदीचे दिवस जवळ आल्याने बाजारात मिठाई आणि इतर अन्नपदार्थांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान राज्यभरात धडक मोहीम राबवली. या कारवाईत अधिकाऱ्यांनी तब्बल १.२० कोटी रुपयांचे ५० टनांहून अधिक अन्नपदार्थ जप्त केले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

FDA ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये तपासणी करण्यात आली. यात १ कोटी १९ लाख ९० हजार ७९२ रुपये किमतीचा ५०,६०१.७८ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये मिठाई, दूध आणि दुधाचे पदार्थ, खाद्यतेल, तांदूळ, सुकामेवा, नमकीन, फरसाण, चहा, मसाले, सॉस, नूडल्स आणि वेफर्स यांचा समावेश आहे.

याशिवाय, विभागाने राज्यभरातील ३० अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित केली आहेत. यामध्ये मुंबईतील १३, कोकण विभागातील ६, पुणे विभागातील ८ आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील ३ आस्थापनांचा समावेश आहे.

मुंबईत स्वच्छतेचा उडालाय बोजवारा

मुंबईतील तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अनेक ठिकाणी उंदीर-घुशींचा सुळसुळाट, अन्नपदार्थांची चुकीच्या पद्धतीने साठवणूक आणि स्वच्छतेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले.

एका ठिकाणी तर अधिकाऱ्यांना अन्न तयार करण्याच्या जागेत मांजरे, उंदराची विष्ठा, जिवंत माश्या आणि मेलेले झुरळे आढळले. फ्रीजमध्ये रक्त साचले होते आणि प्रोसेसिंग विभागात गटाराचे उघडे मॅनहोल होते. अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवले होते आणि कच्च्या पिठावर छापलेले वर्तमानपत्र झाकले होते.

दुसऱ्या एका दुकानात जिवंत झुरळे, पाली, माश्या आणि अळ्या आढळल्या. उघडे अन्नपदार्थ घाणेरड्या पाण्याजवळ ठेवले होते. तसेच, पेस्ट कंट्रोल आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची कोणतीही नोंद तिथे नव्हती.

मुंबईतील इतर अनेक रेस्टॉरंट्स आणि बेकरींमध्येही असेच प्रकार उघडकीस आले आहेत. या सर्व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे FDA ने स्पष्ट केले. चेंबूरमधील एका आस्थापनाकडे तर परवानाच नव्हता, त्यामुळे त्यांना तात्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

विभागवार कारवाईचा तपशील

जोगेश्वरी आणि कोकण विभाग

जोगेश्वरीतील एका दुकानातून अधिकाऱ्यांनी ११.८१ लाख रुपयांचे ७,३४० किलो खाद्यतेल जप्त केले. इथे पॅकिंगसाठी जुने डबे वापरले जात होते आणि साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन झाले होते.

कोकण विभागात (ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग) ३९.९९ लाख रुपयांचे २३,८०६.९० किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. हे पदार्थ निकृष्ट दर्जाचे, चुकीचे लेबल असलेले आणि अस्वच्छ ठिकाणी ठेवलेले होते.

पुणे आणि इतर भाग

पुणे विभागात २८.५४ लाख रुपयांचे ६,३६६.८८ किलो अन्नपदार्थ जप्त झाले. यात खवा, पनीर, तूप, मलई, मिठाई, श्रीखंड, लस्सी, खोबरेल तेल, फरसाण आणि बटाटा वेफर्स होते. हे पदार्थ भेसळयुक्त आणि निकृष्ट असल्याचा संशय आहे.

जळगावमध्ये ४.२८ लाख रुपयांचे ७,७४९.९ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. यात तांदूळ, टुटी फ्रुटी, खवा, कुंदा आणि मिठाईचा समावेश होता.

नागपूर, भंडारा आणि चंद्रपूरमध्ये ३२.७४ लाख रुपयांचा माल जप्त झाला. तर अकोल्यात अस्वच्छ वाहनातून नेली जाणारी २.९४ लाख रुपयांची १,०९७ किलो मिठाई जप्त करण्यात आली. येथील एक गोदाम सील करण्यात आले असून, जप्त केलेला माल नियमानुसार नष्ट करण्यात आला आहे.

प्रतिबंधित पदार्थांवरही कारवाई

FDA ने राज्यभरात प्रतिबंधित अन्नपदार्थांवरही स्वतंत्र कारवाई केली. २६ ठिकाणी छापे टाकून ३०.६३ लाख रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी २२ एफआयआर दाखल करून ३० जणांना अटक केली आहे. तीन दुकाने सील केली असून तीन वाहने जप्त केली आहेत.

यात कोकणातील १५, नाशिकमधील २, छत्रपती संभाजीनगरमधील ३, नागपूरमधील ५ आणि पुण्यातील एका आस्थापनाचा समावेश आहे.

FDA चा इशारा आणि ग्राहकांना आवाहन

जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे FDA ने स्पष्ट केले.

महाराष्ट्र FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रात अन्नपदार्थांचा दर्जा आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकार अत्यंत कठोर आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. मुदत संपलेले, भेसळयुक्त किंवा अस्वच्छ परिस्थितीत तयार केलेले अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई सुरू राहील."

सणासुदीच्या काळात खरेदी करताना ग्राहकांनी अन्नपदार्थांचा दर्जा, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट, लेबल आणि FSSAI परवाना नक्की तपासावा, असे आवाहनही FDA ने केले आहे.