सर्व शासकीय सेवा, योजनांचा लाभ 'आपले सरकार' पोर्टलमधूनच - CM फडणवीस
मुंबई - CM फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले की, नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी आता योजना लाभही हक्काच्या सेवांच्या कायद्यात (Right to Services Act) समाविष्ट केले जाणार आहेत. शासकीय योजनांवर काय म्हणाले..

‘आपले सरकार 2.0’
‘गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनिअरिंग’ या विषयावर आयोजित सभेत फडणवीस म्हणाले, “आतापर्यंत आपण फक्त सेवा पुरवण्याची हमी देत होतो. परंतु पुढे योजनांचे लाभही पात्रतेनुसार नागरिकांना हमखास मिळाले पाहिजेत.” तसेच ‘आपले सरकार 2.0’ हा नागरिकाभिमुख पोर्टल 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना आता व्हॉट्सअपवर सेवा मिळणार आहेत, त्यामध्ये 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाइज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
‘Ease of Living’
ते पुढे म्हणाले की, सर्व शासकीय सेवा व योजनांचे लाभ ‘आपले सरकार’ या एकाच पोर्टलवर उपलब्ध करावेत. विविध विभागांचे पोर्टल्स आणि अॅप्स या पोर्टलमध्ये एकत्रित करण्यात यावेत. शासनाचे उद्दिष्ट नागरिकांच्या ‘Ease of Living’ मध्ये सुधारणा करणे आहे. त्यासाठी प्रशासन पारदर्शक, तंत्रज्ञानस्नेही आणि लोकाभिमुख करणे आवश्यक आहे.
माहिती ऑनलाइन मिळाली पाहिजे
फडणवीस यांनी स्पष्ट केले की नागरिकांनी अर्ज सादर केल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेची माहिती ऑनलाइन मिळाली पाहिजे. अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे हे त्यांना कळाले पाहिजे. तसेच, योजना मंजूर झाल्यानंतर किंवा सेवा मिळाल्यानंतर नागरिकांना ऑनलाइन प्रतिसाद नोंदविण्याची सोय हवी. त्यांच्या तक्रारींचे निराकरणदेखील याच पोर्टलद्वारे झाले पाहिजे.
कागदपत्रांची संख्याही घटवली पाहिजे
“योजनांचे लाभ व सेवा जलद आणि सोप्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी अर्जामधील कॉलम कमी केले पाहिजेत आणि आवश्यक कागदपत्रांची संख्याही घटवली पाहिजे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागरिकाभिमुख प्रशासन
त्यांच्या मते, ‘आपले सरकार 2.0’ या उपक्रमामुळे शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत सहज पोहोचेल आणि राज्यात नागरिकाभिमुख प्रशासनाची नवी पायरी गाठली जाईल.

