Lalbaugcha Raja Visarjan 2025: गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी मुंबईतील लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले. भरती-ओहोटीमुळे विलंब झालेल्या विसर्जनासाठी लाखो भाविक उपस्थित होते आणि अनंत अंबानी यांनी उत्तर आरतीचा सोहळा पाहिला.
मुंबई: गणेशोत्सवाच्या अखेरच्या पर्वावर मुंबईने आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप दिला. फटाक्यांची आतषबाजी, लाखोंच्या गर्दीतील जल्लोष आणि भक्तांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात लालबागचा राजा अखेर अरबी समुद्रात विसर्जित झाला.
अत्याधुनिक तराफ्यावरून 2-3 किमी समुद्रात नेऊन विसर्जन
गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी आलेल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन अत्याधुनिक तराफ्यावरून दोन ते तीन किलोमीटर अरबी समुद्रात नेऊन करण्यात आलं. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व उद्योजक अनंत अंबानी उपस्थित होते. विसर्जनपूर्वीच्या उत्तर आरतीचाही सोहळा अंबानी यांच्या साक्षीनं पार पडला.
भरती-ओहोटीमुळे 12 तासांची प्रतीक्षा
विसर्जनासाठी राजा सकाळी साडेआठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. मात्र, समुद्रात भरतीमुळे विसर्जनाला विलंब झाला. भरती ओसरल्यानंतर, सुमारे १२ तासांच्या प्रतीक्षेनंतर, सायंकाळी साडेचारच्या सुमारास मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात आली. रात्री पुन्हा भरती सुरू झाल्यावर, अखेर साडेआठच्या सुमारास विसर्जन प्रक्रिया पार पडली.
भाविकांची प्रचंड गर्दी, उत्साह ओसंडून वाहतो
विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी उसळली होती. हजारो भक्तांनी प्रत्यक्ष चौपाटीवरून, तर लाखो भाविकांनी माध्यमांद्वारे ‘राजा’चा अखेरचा निरोप पाहिला. फोटो, व्हिडीओ, सेल्फी यांत भक्त गुंतून गेले होते.
भक्कम सुरक्षा, कोळी बांधवांचा मोलाचा सहभाग
या विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका, मुंबई पोलीस, कोस्टगार्ड आणि कोळी बांधव यांचा बंदोबस्त तगडा होता. गेल्या २४ वर्षांपासून कोळी समाज लालबागच्या राजाच्या विसर्जनात सक्रिय सहभागी आहे. यंदाही त्यांनी त्यांची परंपरा जपली.
भावनांचा महापूर, उत्सवात भरभरून सामील झाले मुंबईकर
विसर्जन मिरवणुकीस अनंत चतुर्दशीच्या सकाळी 12 वाजता सुरुवात झाली होती. त्यानंतर तब्बल बारा तास राजा चौपाटीवर होता. मात्र भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. हा संपूर्ण सोहळा मुंबईच्या भक्तीभावाचा आणि उत्सवप्रियतेचा सर्वोच्च दर्शन घडवणारा ठरला.


