Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला आहे. गिरगाव चौपाटीवर मूर्ती तराफ्यावर बसवताना अडचण निर्माण झाल्याने विसर्जन प्रक्रिया थोडा वेळ स्थगित करण्यात आली.
मुंबई : मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध आणि भाविकांच्या गाऱ्हाण्यांचा केंद्रबिंदू असलेल्या लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. सलग २४ तास चाललेल्या भव्य मिरवणुकीनंतर, हा सोहळा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी सज्ज झाला असतानाच, एका किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन प्रक्रिया काही वेळ स्थगित करण्यात आली आहे.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास, लालबागच्या राजाची मूर्ती चौपाटीवर पोहोचली. तेव्हा तिथे आधीच भाविकांचा महापूर उसळला होता. "पुढच्या वर्षी लवकर या!" अशा आर्जवात भक्तगणांनी आपल्या बाप्पाला निरोप दिला. मात्र, विसर्जनाच्या क्षणी मूर्ती तराफ्यावर व्यवस्थित बसवताना अडचणी निर्माण झाल्या. यंदा विसर्जनासाठी खास गुजरातहून आधुनिक तराफा आणण्यात आला होता, परंतु भरतीच्या वेळी समुद्रातील स्थितीमुळे मूर्ती बसवणे शक्य झाले नाही.
सध्या भरती ओसरत चालली असून, पुन्हा एकदा मूर्ती तराफ्यावर सुरक्षितरीत्या चढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर लगेचच लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडणार आहे.
या वर्षी अनंत चतुर्दशी निमित्त, मध्य मुंबईतील नामवंत मंडळांच्या मिरवणुका सुरळीतपणे पार पडल्या. तेजुकाया, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती अशा अनेक मंडळांच्या मूर्ती गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ झाल्या. यावर्षी कोणताही अनुचित प्रकार न घडता, शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात विसर्जनाची परंपरा जपली गेली.
११ दिवसांच्या उत्सवात भक्तांनी गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा केली आणि आता हजारो भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देत आहेत.


