Sunetra Pawar - Sachidanand Singh : सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीबाबत पक्षातूनच आक्षेप घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नेत्याकडून नोटीस पाठवण्यात आली असून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या निवडीला पक्षातूनच विरोध करण्यात आला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून सुनेत्रा यांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांकडून नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, निवडीवर ज्येष्ठ नेत्याचा आक्षेप

सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर पक्षातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर राजकीय वर्तुळाात याची एकच चर्चा आहे. राष्ट्रीय सचिव, झारखंडचे प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंह यांनी ९ जुलै रोजी वकिलांमार्फत सध्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी पक्षाचे सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव या तिघांना वकिलांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

९ जुलै रोजी पाठवलेल्या नोटिशीत त्यांनी असं म्हटलंय, की २६ फेब्रुवारी २०२६ मध्ये घेतलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध आहे. त्यामुळे आधीची निवड रद्द व्हावी आणि पुन्हा नव्याने स्वतंत्र, नि:पक्षपाती निवडणूक अधिकारी नेमावा आणि निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी नोटिशीतून केली आहे. शिवाय नोटिशीत त्यांनी सुधारित ऑफिस बेअररची यादी आणि राष्ट्रीय अध्यक्ष रद्द समजावा असंही सांगितलं आहे. नोटीस पाठवलेले सच्चिदानंद सिंह मागील १५ वर्षापासून पक्षासोबत आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, अजित पवार यांचं जानेवारी २०२६ मध्ये प्लेन क्रॅश अपघातात निधन झालं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत होतं. मात्र प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विरोध झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली होती. आता मात्र पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडूनच सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला ही निवड अवैध असल्याचं म्हणत त्यावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.