KDMC Election : केडीएमसी महापालिकेत भाजपने बिनविरोध विजयांची मालिका कायम ठेवत 8 जागा निर्विरोध जिंकल्या असून, शिंदे गटासह महायुतीचे 12 उमेदवार आधीच विजयी ठरले आहेत. बहुमताच्या दिशेने महायुतीने भक्कम पाऊल टाकले आहे.
KDMC Election : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) भाजपने प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात जोरदार मुसंडी मारत विजयाचा शंखनाद केला आहे. सलग बिनविरोध विजयांची मालिका कायम ठेवत भाजपचे तब्बल 8 उमेदवार निर्विरोध निवडून आले असून, शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध ठरले आहेत. त्यामुळे महायुतीचे एकूण 12 उमेदवार आधीच विजयी ठरल्याने केडीएमसीत महायुतीला निर्णायक आघाडी मिळाली आहे.
भाजपचा केडीएमसीत बिनविरोध विजयाचा जल्लोष
रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर यांच्या बिनविरोध निवडीनंतर भाजपने केडीएमसीत विजयाची हॅट्रिक केली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचा हा विजयाचा आलेख आणखी उंचावला. गुरुवारपर्यंत 5 जागा बिनविरोध असताना, आज आणखी प्रभागांमध्ये माघारी झाल्याने भाजपचे एकूण 8 उमेदवार निर्विरोध झाले आहेत.
मनसे शहराध्यक्षांच्या माघारीने चर्चेला उधाण
प्रभाग 28 मधून भाजपचे महेश पाटील बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रभागातून मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. याशिवाय प्रभाग 26 अ मधून मुकुंद पेडणेकर आणि प्रभाग क्र. 19 (क) मधून साई शिवाजी शेलार हेही भाजप- महायुतीकडून बिनविरोध निवडून आले आहेत.
महायुतीला बहुमताच्या दिशेने भक्कम पाऊल
केडीएमसी महापालिकेत एकूण 122 जागा असून बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी 12 जागा बिनविरोध मिळाल्याने आता महायुतीला बहुमतासाठी केवळ 50 जागा जिंकाव्या लागणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीआधीच भाजप-शिवसेना महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार (Name List):
1. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड १८: रेखा चौधरी
2. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ क: आसावरी नवरे
3. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ ब: रंजना पेणकर
4. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब: ज्योती पाटील
5. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ: मंदा पाटील
6. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २६ अ: मुकुंद पेडणेकर
7. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८: महेश पाटील
8. कल्याण-डोंबिवली – प्रभाग क्र. १९ (क): साई शिवाजी शेलार
ठाण्यात ठाकरे गटाला धक्का
ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने पहिलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून शिंदे गटाच्या उमेदवार जयश्री फाटक या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या पत्नी असलेल्या जयश्री फाटक यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी ऐनवेळी माघार घेतली.


