- Home
- Mumbai
- कल्याण–लोणावळा रूटवरील प्रवाशांसाठी मोठी अपडेट! ११ दिवस रेल्वे वाहतूक विस्कळीत; अनेक गाड्यांचे मार्ग व वेळापत्रक बदलले
कल्याण–लोणावळा रूटवरील प्रवाशांसाठी मोठी अपडेट! ११ दिवस रेल्वे वाहतूक विस्कळीत; अनेक गाड्यांचे मार्ग व वेळापत्रक बदलले
मध्य रेल्वेने कल्याण-लोणावळा मार्गावर २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान इंटरलॉकिंग कामासाठी मोठ्या पावर ब्लॉकची घोषणा केली. या काळात मुंबई-पुणे मार्गावरील इंटरसिटी, डेक्कन एक्सप्रेस, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलणार.

कल्याण–लोणावळा रूटवरील प्रवाशांसाठी मोठी अपडेट!
पुणे: मध्य रेल्वेने कल्याण–लोणावळा व लोणावळा–बोरीवली प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. लोणावळा–बोरीवली यार्ड आणि कल्याण–लोणावळा अप व डाऊन मार्गावर इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगचे मोठ्या प्रमाणात काम हातात घेण्यात येणार आहे.
या कामासाठी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने मोठा पावर ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात अनेक गाड्यांचे नियोजन बदलणार आहे. काही गाड्या उशिराने धावतील, तर काहींचे मार्ग तात्पुरते वळवले जातील.
काही इंटरसिटी आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळात बदल
रेल्वे प्रशासनानुसार मुंबई–पुणे मार्गावरील इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस तसेच मेल/एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
पुणे–मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी १० ते १५ मिनिटे उशिरा मुंबईत पोहोचेल.
२६, २८ व २९ नोव्हेंबर रोजी काही गाड्यांना ठराविक स्थानकांवर थांबवून पुढे मार्ग वळवण्याचे नियोजन आहे.
पुणे–हसरगट्टा सुपरफास्ट, पुणे–हुबळी यांसह अनेक दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांवरही पावर ब्लॉकचा थेट परिणाम होणार आहे.
या गाड्या राहणार उशिराने
२८ व २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.२५ ते सायं. ६.०० दरम्यान ब्लॉकमुळे वेळापत्रकात झालेला बदल:
पुणे–छत्रपती शिवाजी महाराज डेक्कन टर्मिनस एक्सप्रेस – १ तास १५ मिनिटे उशीर
दौंड–इंदूर एक्सप्रेस – १ तास उशीर
कोल्हापूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्सप्रेस – ४० मिनिटे उशीर
बेंगळुरू–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्सप्रेस – ३० मिनिटे उशीर
नागरकोईल–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस – १ तास ३० मिनिटे उशीर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–चेन्नई एक्सप्रेस – १० मिनिटे उशीर
याशिवाय, पुणे–सीएसएमटी इंटरसिटी आणि पुणे–सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या सीएसएमटी येथे १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–चेन्नई एक्स्प्रेसला लोणावळा येथे अंदाजे एक तास अतिरिक्त थांबा देणे आवश्यक ठरणार आहे. तसेच एलटीटी–मुडगाव एक्सप्रेस, एर्नाकुलम एक्सप्रेस आणि कोकणमार्गावरील इतर काही गाड्यांच्या वेळेतही १० ते २५ मिनिटांचा फरक पडणार आहे.
प्रवाशांनी काय करावे?
या ११ दिवसांच्या काळात रेल्वे मार्गावरील कामे मोठ्या प्रमाणावर सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी
प्रवासाआधी अपडेटेड वेळापत्रक तपासावे
शक्य असल्यास पर्यायी गाड्या किंवा वेळ निवडावी
स्थानकांवरील घोषणांकडे लक्ष द्यावे
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी विशेष सूचना दिल्या असून आवश्यक ते बदल सातत्याने प्रसारित केले जातील.

