Dombivli : डोंबिवली स्थानकाचा मोठ्या प्रमाणावर कायापालट करण्याची तयारी मध्य रेल्वेकडून सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत विस्तारित पादचारी पूल, ७० आसनी मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल आणि आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. 

Dombivli : मुंबईच्या उपनगरी रेल्वेचे ‘डीसी टू एसी’ रुपांतरण पूर्ण झाल्यानंतर आता मध्य रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा मोठा संकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी सर्वप्रथम मध्य रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या डोंबिवली स्थानकाची निवड करण्यात आली आहे. या स्थानकाला आधुनिक सुविधांनी सजवून ७० आसनी मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल आणि विस्तारित पादचारी पूल उभारले जाणार आहेत. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची प्राथमिक कामे सुरू झाली असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर महत्त्वाच्या स्थानकांचाही कायापालट करण्यात येणार आहे.

डोंबिवली – मध्य रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक

कल्याण, ठाणे आणि दादर ही गर्दीची प्रमुख स्थानके असली तरी डोंबिवली स्थानक मध्य रेल्वेला सर्वाधिक महसूल देतं. आसपासच्या भागातील प्रवासी मासिक पास काढण्यासाठी डोंबिवलीची निवड करतात, तर कोपरकडे प्रवास करायचा असला तरी पास डोंबिवलीतूनच घेतला जातो. दररोज तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने अनेक वर्षांपासून हे स्थानक उत्पन्नात अग्रस्थानी आहे.

स्थानकाला मिळणार आधुनिक स्वरूप 

जागेची कमतरता, प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि सततची घुसमट या अडचणींचा विचार करून मध्य रेल्वेने आता डोंबिवली स्टेशनचा पूर्ण कायापालट करण्याचे नियोजन केले आहे. या आधुनिक प्रकल्पात समाविष्ट आहे:

  • विद्यमान ३ पादचारी पुलांची रुंदी वाढविणे
  • नवीन चौथा पादचारी पूल उभारणे
  • सर्व पुलांना एकमेकांशी जोडणारी वॉक-वे सिस्टम
  • ७० आसनी मल्टिप्लेक्स थिएटर
  • शॉपिंग मॉलचे बांधकाम
  • बुकिंग ऑफिस व इतर कार्यालये पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करून गर्दीपासून वेगळी व्यवस्था
  • ही सुविधा उभारल्यानंतर डोंबिवली स्थानकाचे रूप पूर्णपणे बदलणार आहे.

‘मॉडर्न स्टेशन’चा पहिला टप्पा सुरू 

मध्य रेल्वेने डोंबिवलीची निवड ही ‘मॉडर्न स्टेशन’ संकल्पनेसाठी पहिल्या प्रयोगात्मक ठिकाण म्हणून केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकल्पाची प्राथमिक कामे सुरू असून, डोंबिवली मॉडेल यशस्वी ठरल्यास ठाणे, कल्याण, दादर यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांचादेखील आधुनिक पद्धतीने कायापालट केला जाईल.