भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी पहिल्यांदा अवकाशात भारतीय झेंडा फडकावला होता. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारले होते, की अंतराळातून भारत कसा दिसतो? त्यावर ते म्हणाले होते, की सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा.
मुंबई - भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा आणि भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या जातीवरुन सोशल मीडियावर जोरदार वादळ उठल्याचे दिसून येत आहे. मेरिटच्या बेसीसवर ब्राह्मण समाजाचे लोक अवकाशावर आपले नाव कोरत असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या असून त्याला प्रत्युत्तर देत काही इतरही पोस्ट समोर आल्या आहेत.
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी पहिल्यांदा अवकाशात भारतीय झेंडा फडकावला होता. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारले होते, की अंतराळातून भारत कसा दिसतो? त्यावर ते म्हणाले होते, की सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. आता हे वाक्य इतिहासात अजरामर झाले असून त्याची साक्ष देते. शुभांशु शुक्ला हेही अॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत अवकाशाला गवसणी घालत आहेत. त्यांनीही अंतराळातून ‘’जय हिंद जय भारत'' असा संदेश दिला आहे.
अंतराळ मोहिम म्हटली की देशासाठी ती अभिमानाची बाब असते. देशातील सर्व नागरिक या अंतराळवीरांच्या पाठिशी उभे असतात. त्यांना या अंतराळवीरांचा मोठा अभिमान असतो. यावेळी त्यांचा धर्म, जात, पंथ बघितला जात नाही. अमेरिकेने तर अंतराळवीरांची निवड करताना काही भारतीय वंशांच्या लोकांचीही निवड केली आहे. त्यामुळेच कल्पना चावला, सुनिता विल्यम्स यांना अंतराळात जाण्याची संधी मिळाली.
पण भारतात कोणतीही गोष्ट म्हटली की जात, धर्म, पंथ बघितला जातो. विशेष म्हणजे आधुनिक विचारांनी पुढारलेला सोशल मीडियाही यात मागे नाही. तोही यामुळे बाधित झालेला दिसून येतोय. त्यामुळे शुभांशु शुक्ला अंतराळात गेले असताना जातीच्या पोस्ट समोर आल्या आहेत. त्यावर समाजातून कडाडून प्रहार केला जात असला तरी ही मानसिकता कधी जाईल, असा प्रश्न विचारला जात आहे.


