तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या लग्नाआधी पत्नीला नेमकं काय सांगितलं होतं, त्यांच्या पत्नी खऱ्या अर्थाने त्यांच्या अर्धांगिनी कशा आहेत, अशा अनेक गोष्टी मुंढे यांनी शेअर केल्या आहेत. त्यांच्या लग्नाबाबतही त्यांनी इंटरेस्ट्रिंग गोष्ट सांगितली आहे. वाचा नेमकं काय म्हणाले.

मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या कडक शिस्तीमुळे, त्यांच्या रोखठोक कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये २१ वर्षांत २५ बदल्या झाल्या आहेत. मात्र या बदल्यांवेळी त्यांच्या कुटुंबावर, मुलावर-पत्नीवर याचा परिणाम होतो असं त्यांनी सांगितलं. कुटुंब कशी साथ देतं? इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीसोबत पहिल्या भेटीत काय चर्चा झाली होती. याबाबत अनेक गोष्टींची त्यांनी उत्तरं दिली आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सततच्या बदल्यांचा कुटुंबावर परिणाम

सतत होणाऱ्या बदल्यांबाबत मुंढे म्हणतात, 'माझ्या अनेक बदल्या होतात. त्यामुळे सतत घरं बदलावी लागतात. त्यामुळेच घरातील सामानही कमी आहे. माझ्या पत्नीने सामान सोडायचं मग ते बांधायचं त्यापेक्षा जे गरजेचे आहे, तेच सोडायचं आणि त्याचाच वापर करायचा. इतर सामान तसंच बांधलेलं ठेवायचं, अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत, असं आपल्या सततच्या घर बदलण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं.

सतत बदल्या होत असल्याने कुटुंबाला याचा त्रास होतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना मुंढेंनी सांगितलं, की 'हो कुटुंब या बदल्यांमुळे सफर होतं. कुटुंबाला याचा त्रास सहन करावा लागतो. माझ्या मुलाच्या अनेक शाळा बदलाव्या लागल्या. त्याच्यामुळे त्याचे मित्र झाले नाहीत. त्यामुळे माझ्यामुळे कुटुंबाला हा त्रास नक्कीच सहन करावा लागतो. मी पब्लिक सर्वंट म्हणून काम करतो. मी ती जबाबदारी घेतलेली आहे. सुदैवाने माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी अनेक गोष्टी करू शकतो. पण कुटुंबावर याचा परिणाम नक्कीच होतो', अशी खंतही मुंढेंनी बोलून दाखवली आहे.

तुकाराम मुंढेंनी सांगितली लग्नाची गोष्ट

पत्नीची साथ कशी मिळते याबाबत बोलताना मुंढे यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, 'ज्यावेळी लग्न जमलं त्यावेळी नागपूरमध्ये सीओ होतो. नुकतीच पोस्टिंग झाली. आमचं अरेंज मॅरेज आहे. ज्यावेळी माझी आणि पत्नीही पहिली भेट झाली, त्यावेळी पहिल्यांदाच सांगितलं होतं की माझा स्वभाग असा आहे, मला काम करताना तुझ्या जर वेगळ्या अपेक्षा असतील जसं की खूप गाड्या मिळतील वगैरे तर आपण पुढे जायला नको, असं तिला आधीच सांगितलं होतं'.

पुढे ते म्हणाले, 'मी पब्लिक सर्वंट आहे. माझा फोकस पब्लिक सर्विस राहणार आहे, आणि तु माझी साथ देऊ शकते, तरच आपण पुढे जाण्यासाठी विचार करू शकतो. पहिल्याच भेटीत मी तिला हे स्पष्टपणे सांगितलं होतं.'

पत्नीने होकार का दिला?

'लग्नानंतर आता मी तिला विचारतो, मी तुला पहिल्याच भेटीमध्ये इतकं बोललो होतो स्पष्टपणे, तरी तु माझ्यामध्ये असं काय बघितलं, की होणार दिला. मला त्यावर आश्चर्यकारकरित्या असं उत्तर मिळतं, की तुमची जी समाजाबद्दलची तळमळ होती, त्या वाक्यामुळेच मी लग्न केलं', अशी खास आठवण तुकाराम मुंढेंनी सांगितली.

पहिल्यांदा प्रेमात कधी पडलात यावर बोलताना ते म्हणाले, 'लव्ह अॅट फर्स्ट साइट असं कधी जाणवलं नाही. पण जसं आम्ही बोलत गेलो, विचार जुळत गेले, तसं प्रेम वाढत गेलं आणि आज विचारांत काहीसे बदल असतील तरी ज्या पद्धतीने तिने घराची दुसरी बाजू सांभाळली आहे, खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून ती वाखणण्याजोगी आहे', असं म्हणत त्यांनी पत्नीचं कौतुक केलं आहे.