उद्योगपती हर्ष मारिवाला यांनी त्यांच्या कंपनीतील नेतृत्वाबाबत टिप्पणी केली आहे. कोण लिडर होऊ शकतात आणि कोण होऊ शकत नाहीत हेही सांगितले आहे.

मुंबई : "मरिकोच्या सुरुवातीच्या टप्प्यात मी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मी तरुणांना सुरुवातीलाच मोठी जबाबदारी दिली. त्यांनी वर्षानुवर्षे स्वतःला सिद्ध केल्यावर नव्हे तर अगदी सुरुवातीलाच त्यांना जबाबदारी दिली. त्यांना खरे रोल, खरी जबाबदारी आणि त्याचे परिणामही स्वीकारायला लावले," असे मत मरिकोचे संस्थापक हर्ष मारीवाला यांनी व्यक्त केले.

मारीवाला सांगतात की, काही तरुणांनी चुकाही केल्या, पण ते अपेक्षितच होते. मात्र त्यांनी शिकण्याची तयारी दाखवली, अभिप्राय मागितला, सुधारणा केल्या, पुढाकार घेतला आणि कालांतराने तेच लोक संस्थेतील सर्वोत्तम नेत्यांपैकी एक बनले.

"माझा दृष्टिकोन सोपा आहे जर कोणी चूक केली, पण ती कबूल करून सुधारणा केली आणि ती चूक पुन्हा केली नाही, तर त्यांनी प्रगतीचा हक्क कमावला. पण जर कोणी जबाबदारीपासून पळ काढत असेल किंवा चुकांपासून लपत असेल, तर ते नेते होण्यासाठी तयार नाहीत," असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, सक्षमीकरण (Empowerment) म्हणजे केवळ पदव्या देणे नाही, तर लोकांना सुरक्षित अपयशाचा वाव देणे आणि त्यातून हुशारीने उभे राहण्यासाठी आधार देणे हे खरे सक्षमीकरण असते.

"जर प्रत्येक निर्णयासाठी तुमच्या मंजुरीची गरज असेल, तर तुम्ही उच्च कार्यक्षम संस्था उभी करू शकत नाही. नेतृत्वाची खरी कसोटी ही परिणामांवर नियंत्रण ठेवण्यात नसून इतरांना आत्मविश्वासाने नेतृत्व करू देण्यात आहे," असे मार्मिक विधानही त्यांनी यावेळी केलं.