तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे, बेधडक निर्णय घेणारे आणि जनहितासाठी झटणारे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या २० वर्षांच्या सेवेत २४ वी बदली करण्यात आली आहे.
मुंबई : राजकीय दबावाचा विचार न करता नेहमीच जनहितासाठी काम करणारे आणि कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी धसक्याचे ठरणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या २० वर्षांच्या प्रशासकीय सेवेत ही त्यांची तब्बल २४ वी बदली आहे. त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी महत्त्वाची पदं भूषवली असून त्यांच्या कर्तबगारीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
नवीन जबाबदारी मिळाली
सध्या तुकाराम मुंढे असंघटित कामगार आयुक्त पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीनंतर मंगळवारी सायंकाळी विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या. कार्यक्षम अधिकाऱ्यांसाठी ही नवीन पोस्ट काहीशी दुय्यम समजली जात असल्याने या बदल्येबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात
तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांचा जन्म बीड जिल्ह्यात झाला. त्यांनी सोलापूर येथून आपल्या सेवेला सुरुवात केली. पुढे आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणूनही त्यांनी चोख काम केलं. नंतर नांदेड जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी एका शाळेतील गैरहजर शिक्षकांना निलंबित केलं आणि त्यांच्या कडक धोरणांची पहिली झलक राज्याला मिळाली.
प्रभावी कारवाई आणि जनमानसात लोकप्रियता
या कारवाईनंतर त्यांच्या नावाची अधिक चर्चा होऊ लागली. शिक्षकांच्या गैरहजेरीचं प्रमाण त्यांनी १०-१२% वरून १-२% पर्यंत खाली आणलं. यानंतर त्यांची नागपूर, नाशिक, आणि मुंबई अशा विविध ठिकाणी बदली झाली. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्त म्हणून त्यांनी लाखो आदिवासींना थेट लाभ मिळवून दिला. मुंबईत खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले.
वारकऱ्यांसाठी उभारली सुविधा
जालना जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. नंतर सोलापूर जिल्हाधिकारी असताना त्यांनी आषाढी वारीचं नियोजन अत्यंत प्रभावीपणे केलं. नदीत प्रात:विधी टाळण्यासाठी ३ हजार शौचालयं काही दिवसांत उभारली. व्हीआयपी दर्शन रद्द करून सामान्य वारकऱ्यांना प्राधान्य दिलं.
नवी मुंबईतला मॉर्निंग वॉक प्रकल्प
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी “मॉर्निंग वॉक विथ कमिश्नर” हा अभिनव उपक्रम सुरू केला. सकाळी गार्डनमध्ये फिरायला येणारे नागरिक त्यांना अडचणी सांगत आणि मुंढे त्या तत्परतेने सोडवत. त्यामुळे ते सामान्य जनतेमध्ये लोकप्रिय ठरले.
राजकारण्यांशी संघर्ष कायम
तुकाराम मुंढे यांचा बेधडक आणि स्पष्टवक्तेपणा त्यांच्या अनेक बदल्यांचे कारण ठरला. अनेक वेळा त्यांच्या निर्णयांमुळे राजकीय नेते अस्वस्थ झाले. पण मुंढे मात्र कायद्याचं पालन आणि शिस्तीचं धोरण यावर ठाम राहिले. कधी समन्वयाने, तर कधी थेट कारवाई करत त्यांनी आपली ओळख कायम ठेवली.


