गॅस गळती आढळल्यास त्वरित गॅस बंद करणे, दरवाजे-खिडक्या उघडणे, विजेचे स्विच वापरणे टाळणे आणि अग्निशमन विभागास संपर्क करणे, हे नियम पुन्हा लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे.
मुंबई - एका धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या फुटेजमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरमधून झालेल्या मोठ्या गळतीनंतर अचानक स्फोट होतो. त्यानंतर दोन व्यक्ती जीवावर खेळून बाहेर पळून जातात. हा सारा प्रकार इतका भीषण होता की क्षणाचाही विलंब त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला असता.
नेमकं काय घडलं?
ही घटना १८ जून, बुधवारी दुपारी ३ वाजता घडल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समजते. हा प्रकार कोणत्या भागात घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ती मेसमधील घटना आहे. व्हिडीओची सुरुवात एका मध्यमवयीन महिलेपासून होते, जी जमिनीवर पडलेल्या एलपीजी सिलिंडरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याचे पाहते. ती गडबडून बाहेर मदतीसाठी धावते.
थोड्याच वेळात स्फोट
महिला काही क्षणांनी एका पुरुषासोबत परत येते. दोघे वेगवेगळ्या दारातून त्या खोलीत प्रवेश करतात. ते दोघे मिळून गळती रोखण्याचा प्रयत्न करतात. पण संपूर्ण खोलीत आधीच गॅस पसरलेला असतो. अचानक एक मोठा स्फोट होतो. संपूर्ण स्वयंपाकघर जळत्या ज्वाळांनी भरून जातं.
दरवाजे-खिडक्या उघडे ठेवणे ठरले फायद्याचे
स्फोट मोठा असला तरी, महिलेने प्रसंगावधान राखून दरवाजे व खिडक्या उघडे ठेवले होते, ज्यामुळे खोलीत पसरलेला गॅस बाहेर पडत राहिला. स्फोटाचा तीव्रपणा कमी झाला. याच निर्णयाचे दोघांचा जीव वाचला. स्फोटाच्या क्षणी दोघेही वेगाने बाहेर धावले. त्यामुळे कोणतीही शारीरिक इजा झाली नाही.
सोशल मीडियावर स्तुतिसुमने
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकांनी या महिलेच्या शांतपणे विचार करून घेतलेल्या निर्णयाचे आणि धाडसाचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, "जर खिडक्या बंद असत्या, तर स्फोट अधिक मोठा झाला असता. तिचे प्रसंगावधानाने दोघांचे प्राण वाचवले."
महत्त्वाचा संदेश
ही घटना गॅस गळतीच्या परिस्थितीत योग्य निर्णय किती महत्त्वाचा असतो याचे उत्तम उदाहरण आहे. वेळेवरची सावधगिरी, हवा खेळती ठेवणे आणि गोंधळून न जाता निर्णय घेणे यामुळे मोठा अपघात टळला. सुदैव आणि शहाणपणा यांच्या एकत्रित प्रभावामुळे दोन जिव वाचले आणि एक मोठी शोकांतिका टळली.


