Paneer vs Cheese Analog : महाराष्ट्रात 1 मेपासून ‘चीज अॅनालॉग’ वापरणाऱ्या सर्व विक्रेत्यांना त्याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकांची दिशाभूल थांबवण्यासाठी FDAने हे पाऊल उचलले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
Paneer vs Cheese Analog : ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि अन्नपदार्थांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ‘चीज’ किंवा ‘पनीर’ म्हणून विकल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये जर प्रत्यक्षात ‘चीज अॅनालॉग’ (दुधाव्यतिरिक्त घटकांपासून बनवलेले पर्यायी पदार्थ) वापरले असतील, तर त्याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असेल. हा नवा नियम 1 मे 2026 पासून राज्यभर लागू होणार आहे.
FDAचा स्पष्ट आदेश: पारदर्शकतेला प्राधान्य
अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे-पाटील यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना त्यांच्या मेन्यू, डिस्प्ले बोर्ड आणि बिलांवर ‘चीज अॅनालॉग’ किंवा ‘डेअरी अॅनालॉग’ असा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. ग्राहकांना नेमके काय खाल्ले जात आहे याची माहिती मिळावी, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 च्या कलम 18(2)(e) नुसार ग्राहकांना माहितीपूर्ण निवडीचा अधिकार असल्याचे FDAने अधोरेखित केले आहे.
चीज अॅनालॉग म्हणजे नेमकं काय?
पारंपरिक पनीर हे केवळ दुधापासून बनते, तर ‘चीज अॅनालॉग’ हा पदार्थ खाद्य तेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर दुधाव्यतिरिक्त घटकांचा वापर करून तयार केला जातो. दिसायला आणि चवीला साधारण सारखा वाटला, तरी पौष्टिक मूल्य आणि घटकांच्या दृष्टीने दोन्हीमध्ये मोठा फरक असतो. FDAने स्पष्ट केले आहे की हे पदार्थ हानिकारक नसले तरी ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी पारदर्शकता आवश्यक आहे.
तक्रारींमुळे निर्णय; उल्लंघनावर कारवाई
गेल्या काही काळात ‘पनीर’ नावाखाली पर्यायी पदार्थ विकल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यानंतर FDAने हा कठोर निर्णय घेतला. नवीन नियम केवळ रेस्टॉरंटपुरता मर्यादित नसून पॅकेज्ड फूड उत्पादकांनाही लागू होतो. ‘लेबलिंग आणि डिस्प्ले’ नियम, 2020 नुसार उत्पादनांवर स्पष्ट माहिती देणे आवश्यक असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
ग्राहकांनीही घ्यावी खबरदारी
FDAने ग्राहकांनाही जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. पॅकेज्ड पनीर खरेदी करताना लेबल नीट वाचणे, ‘अॅनालॉग’ शब्द आहे का हे तपासणे आवश्यक आहे. सुटे पनीर घेताना विक्रेत्याकडे खात्री करून घेणे, तसेच रेस्टॉरंटमध्ये मेन्यू आणि बिल तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्राहक सजग राहिल्यासच या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते.

