Mumbai Crime : मुंबईतील एका उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून 63 लाखांची उकळणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिला क्रिकेटर फारखांदा खान, तिचा भाऊ आणि एका साथीदाराला मुंबई पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Mumbai Crime : मुंबईत सेक्सटॉर्शनच्या गंभीर गुन्ह्याने खळबळ उडाली आहे. एका महिला क्रिकेटरने उद्योगपतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून तब्बल 63 लाख रुपये उकळल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत संबंधित महिला क्रिकेटर आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
महिला क्रिकेटर आणि साथीदारांना अटक
या प्रकरणातील मुख्य आरोपी फारखांदा खान ही जम्मू-काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटू असल्याचे समोर आले आहे. ती महिला टी-20 स्पर्धांमध्येही सहभागी झाली होती. पोलिसांनी तिला आणि तिच्या भावाला दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक केली, तर त्यांचा साथीदार इम्तियाज वाणी याला श्रीनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रेमातून सुरू झालेली ओळख, ब्लॅकमेलिंगपर्यंत पोहोचली
दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात राहणारा 28 वर्षीय उद्योगपती 2024 मध्ये पश्चिम उपनगरात राहत असताना फारखांदाच्या संपर्कात आला होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि पुढे दोघांमध्ये जवळीक वाढली. मात्र, काही काळानंतर फारखांदाने पैशांची मागणी केली. उद्योगपतीने नकार दिल्यानंतर त्याला धमकावण्यास सुरुवात झाली.
चॅट्स व्हायरल करण्याची धमकी, 63 लाखांची उकळणी
फारखांदाने दोघांमधील खासगी चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देत उद्योगपतीकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. सुरुवातीला 23 लाख आणि त्यानंतर आणखी 40 लाख रुपये देण्यास त्याला भाग पाडले गेले. एप्रिल 2024 पासून ही उकळणी सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.
पैशांचा व्यवहार कुटुंबीयांच्या खात्यांत
उकळलेले पैसे विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. काही रक्कम आरोपी इम्तियाज वाणीच्या खात्यात, तर काही रक्कम फारखांदाच्या वडील आणि भावाच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आली. तिचा भाऊ बाझिल अझीझ खान हा देखील उद्योगपतीला सातत्याने धमकावत होता, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांचा तपास सुरू, आणखी खुलास्यांची शक्यता
मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींकडून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

