CM Devendra Fadnavis on Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्जमाफी कधी होणार याबाबत सतत सरकारकडे विचारणा होत होती. आत या दिशेने सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे. कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, उद्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यात ३० जुलैपर्यंत कर्जमाफी मिळेल असं सांगण्यात आलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३० जुलैच्या आत कर्जमाफी मिळू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करू - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना सांगितलं, की 'कर्जमाफीची प्राथमिक यादी उद्या जाहीर करू, ३१ जुलैआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील. उद्या देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. तसंच अजित पवार यांची जयंती आहे. त्यामुळे उद्याच कर्जमाफीची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न आहे'. तसंच बोगस बियांणं प्रकरणात कारवाई सुरू आहे. आतापर्यंत ११ हजारहून अधिक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनंतर ८१ कंपन्यांविरोधात बोगस बियाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहितीदेखील दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. यशोदा, अकोल्यातील रवी हायब्रिड सीड्स अँड रिसर्च, बूस्टर प्लान्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, पार्थ जेनेटिक्स या कंपन्यांबाबत बोगस बियाणांप्रकरणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

३१ जुलैआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील - कृषीमंत्री

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, की 'इन्कम टॅक्सबाबतचा डेटा दोन दिवस आधीच मिळाला आहे. यात कोणत्याही अडचणी नाही. त्यामुळे कर्जमाफीची यादी उद्या जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ३१ जुलैआधी शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होतील.'

कर्जमाफीबाबत बळीराजाला दिलासा

दरम्यान, कर्जमाफीच्या घोषणेकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेने मोठा दिलासा मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कर्जमाफी होणार असल्याची चर्चा होती. अखेर उद्या कर्जमाफीची यादी जाहीर होत आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.