ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची प्रकृती गंभीर झाली असून, त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

तीव्र व्हायरल इन्फेक्शन

सुरुवातीला अण्णा हजारेंवर अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथील एका रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू होते. पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना कार्डियाक रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आलं. ८७ वर्षीय अण्णा हजारेंना तीव्र व्हायरल इन्फेक्शन झालं असून, त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. डॉ. भन्साळी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम अण्णांच्या विविध चाचण्या करत असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

देशाचं लक्ष वेधणारे आंदोलक

२०११ मध्ये 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' आंदोलनामुळे अण्णा हजारे देशभर ओळखले गेले. राळेगणसिद्धीसारख्या एका गावाला आदर्श गावात बदलण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. नुकतंच त्यांनी 'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची विनंती केली होती. अण्णा हजारे लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील त्यांचे चाहते आणि शुभचिंतक प्रार्थना करत आहेत.