मुंबईसह उपनगरातील शाळांना आज देखील सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला एक मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. याच व्हायरल पोस्टवर महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई : मुंबईत झालेल्या धो-धो पावसामुळे काल (19 ऑगस्ट) शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. याशिवाय रेड अलर्ट देखील हवामान खात्याकडून जारी करण्यात आला होता. अशातच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही केले होते. पण सोशल मीडियावर ‘रेड अलर्ट मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये 20 ऑगस्टला सुद्धा बंद राहतील’ असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मात्र, हा मेसेज खोटा असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) स्पष्ट केले आहे.

बीएमसीचे स्पष्टीकरण

मंगळवारी बीएमसीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा मेसेज बनावट असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारची कोणतीही माहिती महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली नाही.

व्हायरल मेसेजमध्ये काय दावा करण्यात आला होता?

सोशल मीडियावर पसरलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते की, भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ‘रेड अलर्ट’मुळे 20 ऑगस्ट रोजी मुंबई आणि उपनगरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील. या मेसेजमध्ये बीएमसीच्या अधिकृत पोस्टचा भास निर्माण करण्यात आला होता.

सत्य काय आहे?

बीएमसीने स्पष्ट केले की, 20 ऑगस्ट रोजी मुंबई व उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. तर रेड अलर्ट हा फक्त रायगड जिल्ह्यासाठी होता, जिथे अतिवृष्टीचा अंदाज होता.

नागरिकांना इशारा

नागरिकांना दिशाभूल होऊ नये यासाठी बीएमसीने स्वतः त्या बनावट मेसेजचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. खोटी माहिती पसरवण्यापासून दूर राहावे आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले.

Scroll to load tweet…