- Home
- Mumbai
- नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी–पनवेल प्रवास होणार थंडगार; 26 जानेवारीपासून सुरू होणार AC लोकल
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी–पनवेल प्रवास होणार थंडगार; 26 जानेवारीपासून सुरू होणार AC लोकल
CSMT To Panvel AC Local : साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबईकरांसाठी CSMT ते पनवेल हार्बर मार्गावर २६ जानेवारीपासून पुन्हा एसी लोकल सेवा सुरू होत आहे. वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
मुंबई : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल हार्बर मार्गावर तब्बल साडेतीन वर्षांनंतर पुन्हा एसी लोकल धावणार आहे. 26 जानेवारीपासून या मार्गावर एसी लोकल सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही काळापासून हार्बर मार्गावर एसी लोकलची मागणी सातत्याने वाढत होती. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल सेवांनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही नॉन-एसी लोकल फेऱ्यांच्या जागी एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
साडेतीन वर्षांनंतर हार्बर मार्गावर एसी लोकलचे पुनरागमन
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी प्रवासीसंख्या आणि तीव्र विरोधामुळे मे 2022 मध्ये हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या एसी गाड्या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या. मात्र, नवी मुंबई आणि आसपासच्या भागातून प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढल्याने आता पुन्हा हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवार ते शनिवारच एसी लोकल सेवा
सीएसएमटी–पनवेल मार्गावर सध्या धावणाऱ्या 14 नॉन-एसी लोकल फेऱ्यांच्या बदल्यात एसी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत दोन विशेष फेऱ्यांचा समावेश असेल. मात्र, या एसी लोकल सेवा फक्त सोमवार ते शनिवार या कालावधीतच चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पश्चिम रेल्वेवरही एसी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ
दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठीही दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सध्या चर्चगेट–विरार मार्गावर 109 एसी लोकल फेऱ्या सुरू असून, 26 जानेवारीपासून आणखी 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये सहा अप आणि सहा डाउन फेऱ्यांचा समावेश असेल. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांची एकूण संख्या 121 वर जाणार आहे.
मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार
या निर्णयामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होणार असून, विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

