मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज तिसरा दिवस आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे. जरांगे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना अस्वस्थ वाटत आहे.
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून आंदोलकांची व्यवस्था करण्यात सरकारने अडथळे निर्माण केले आहेत. मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला बसताच अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप करणारे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर दाखल झाले आहेत.
रणजित कासले यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट
रणजित कासले यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आझाद मैदानावर हजर झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आझाद मैदानात आंदोलकांसोबत उपस्थित राहून त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रणजित कासले काय म्हणाले?
कासले म्हणाले की, "मी नेहमी सोशल मीडियावर माझे विचार मांडत असतो. याआधीही बोललो आहे आणि आता देखील बोलत आहे. मराठा समाजाच्या मुद्द्यावर जेव्हा मी भूमिका घेतली, तेव्हा मला अनेकांनी आंदोलनात सहभागी होण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच मी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. माझ्यावर काही केसेस सुरू आहेत, पण मला जे अधिकार दिले आहेत त्यानुसार मी मीडियावर माझे मत व्यक्त केले होते. खरं तर मी ओबीसी समाजातून आहे, पण माझ्या कठीण काळात मराठा समाजाने मला खूप पाठिंबा दिला. गावखेड्यांत मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मला योग्य वाटलं म्हणूनच मी या आंदोलनात आलो आणि पुढील तीन-चार दिवस मी इथेच सहभागी राहणार आहे."
मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली
मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्न पाणी घेतलेलं नाही. आता त्याच्या तब्येतीवर याचा परिणाम होत असून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. शनिवारी मध्यरात्री त्यांना बरं वाटत नसल्यामुळं डॉक्टरांना बोलावण्यात आलं होतं. राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या मागणीवर काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.
