मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सरकारमध्ये सहभागी होण्यावरून चर्चा झाल्यानंतर, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सरकारमध्ये सहभागी होण्यावरून जुगलबंदी रंगली होती. यावरून एकमेकांमध्ये हेवेदावे मोठ्या प्रमाणावर झाले. त्यानंतर मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाल्याची चर्चा सुरु झाली. हे दोन्ही नेते बीकेसीमधील सोफीटेल हॉटेलमध्ये एकाचवेळी उपस्थित होते.
नेमकी काय चर्चा झाली असेल?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची पावसाळी अधिवेशनाच्यावेळी खुली ऑफर दिली होती. उद्धवजी तुम्हाला २०२९ पर्यंत कोणताही स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा स्कोप आहे. आपण ते वेगळ्या पद्धतीने बोलू. ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्र पक्ष आहे असं फडणवीस यांनी बोलताना म्हटलं होत.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाला उत्तर दिल. त्यांनी बोलताना म्हटलं होत की, या अशा प्रकारच्या चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात होत्या आणि त्या प्रकारचं वातावरण टिकून राहायला हवं. त्यावेळी ऑफर दिली, स्वागताला आलो असंही मिश्कीलपणे आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिल होत.
एकनाथ शिंदे यांना नाव न घेता आदित्य ठाकरेंचा टोला
"मी माझ्या मित्रांसोबत आलो होतो. आमचा डिनरचा प्लान होता. त्याच्यासोबत संगीतातला संपूर्ण कार्यक्रम पाहिला आणि मग बाहेर पडलो. मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीच्या बातम्या ऐकत होतो. पण आता या बातम्या पाहून एखादी व्यक्ती गावाकडे परत जाईल, असं वाटतं," अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टीका केली.
फडणवीसांना भेटलात का? काय म्हणाले आदित्य…
"तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटलात का?" असा प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं. "चालतंय ते चालू द्या!" असं म्हणून ते तिथून निघून गेले.
काही तरी वेगळं घडतंय?
शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमाविषयी वेगवेगळ्या दावे केले जात आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसाठी थांबले होते, असं बोललं जातंय. एवढंच नव्हे तर, "तुम्ही ऑफर दिली म्हणून मी स्वागताला थांबलो," अशी चेष्टाही त्यांनी केल्याचं सांगण्यात येतं.
ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील नात्यात सहजपणा वाढलेला दिसत असतानाच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांची गुप्त भेट घेतल्याचं समोर आलं. ही भेट बंद दाराआड झाल्याची माहिती आहे, आणि यामध्ये काय चर्चा झाली, हे स्पष्ट झालेलं नाही.
तरीदेखील या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चांगलंच तापलेलं वातावरण दिसत आहे. राजकारणात जसं दिसतं तसं नसतं, असं म्हणतात, आणि सध्या उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींमागेही काही वेगळंच शिजत असल्याची चर्चाच जोर धरू लागली आहे.
कुणी कुणाला भेटलं म्हणजे युतीसाठी भेटलं असा अर्थ होत नाही
विधानपरिषदेच्या दालनात मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांची भेट झाली होती. यावेळी बोलताना फडणवीस यांनी कोणी कोणाला भेटले म्हणजे युतीसाठी भेटले असा त्याचा अर्थ होत नाही असं म्हटलं होत. आता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली का आणि झाली असेल तर चर्चा काय झाली असेल यावरून चर्चांना सुरुवात झाली आहे.
