त्यानंतर मात्र ठाकरेंच्या एकिकरणाची चर्चा संपुष्टात आल्याचे दिसून येते. त्यामुळे फडणवीसांनीच दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या फुगा फोडला असल्याची चर्चा आहे.
मुंबई - उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येतील आणि महापालिका निवडणुका एकत्रित लढतील अशी चर्चा मध्यंतरी सुरु झाली होती. याबाबत दोन्ही ठाकरेंनी, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि ठाकरेंच्या मुलांनीही सकारात्मक संकेत दिले होते. पण ही युती अटींमध्ये अडकल्याचे बोलले जाते. या दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट घेऊन बंदद्वार चर्चा केली होती. त्यानंतर मात्र ठाकरेंच्या एकिकरणाची चर्चा संपुष्टात आल्याचे दिसून येते. त्यामुळे फडणवीसांनीच दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या फुगा फोडला असल्याची चर्चा आहे.
मुंबईतील प्रभाग रचना जाहीर व्हायराल ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर महापालिका निवडणुका जाहीर होती. साधारपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये या निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या संभाव्य युतीच्या चर्चेवरही पडदा पडला असून सध्या दोन्ही ठाकरेंनी पक्ष बांधणीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची दमदार तयारी; राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बांधणीचा धडाका
राज्याच्या सर्वात मोठ्या आणि प्रभावी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) संघटनात्मक तयारीस जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, निवडणुकीची रणनीती आणि शहरातील संघटनेची नव्याने बांधणी यावर भर देण्यात आला.
अमित ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
या बैठकीत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे शाखा प्रमुखपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. अमित यांना पक्षातील अधिक सक्रीय करण्याचा हेतू यामागे असल्याचे पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले. या नव्या भूमिकेतून ते थेट कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार असून, यामार्फत पक्षाच्या युवा नेतृत्वाला चालना दिली जाणार आहे.
मुंबईत प्रथमच शहराध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती
मनसेच्या मुंबई शहर संघटनेत यापूर्वी विभागप्रमुखांची नियुक्ती होत असे, मात्र आता प्रथमच मुंबई शहराध्यक्षपद निर्माण करून त्यावर संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली तीन उपाध्यक्षांची नेमणूक झाली असून, योगेश सावंत, कुणाल माईणकर आणि यशवंत किल्लेदार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
गुढीपाडव्याला राजकीय भूमिका स्पष्ट करणार – राज ठाकरे
माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे टाळले. मात्र, त्यांनी स्पष्ट केलं की "मी ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी आमची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे." त्यांनी यावेळी पत्रकारांना उत्तर देताना टोला लगावत म्हटलं, "तुमच्याकडे राजकारणाचा अभ्यास कमी आहे म्हणून असे प्रश्न विचारले जातात."
केंद्रीय समिती स्थापन; वरिष्ठ नेत्यांकडे निरीक्षणाची जबाबदारी
पक्षाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने स्वतंत्र केंद्रीय समिती स्थापन केली आहे. या समितीत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आणि ठाण्याचे अविनाश जाधव यांचा समावेश आहे. ही समिती संपूर्ण राज्यातील कार्यपद्धती, यंत्रणा आणि प्रचारावर नजर ठेवणार आहे.
“मनसेचं पालिका मिशन आजपासून सुरु” – संदीप देशपांडे
बैठकीनंतर बोलताना शहराध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले, “आजपासून मनसेचं पालिका मिशन सुरू झालं आहे. संघटनात्मक दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप, निवडणुकीतील भूमिकेचा आराखडा आणि नागरिकांशी संवाद वाढवण्याची रणनीती निश्चित करण्यात आली.”
निवडणुकीची रणधुमाळी सुरु; मनसे पुन्हा जोमात
मुंबई महापालिका ही देशातील सर्वात मोठ्या महसुलाची महापालिका मानली जाते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट), भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मनसेही या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेचा प्रभाव कमी झाला असला, तरी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा नव्या जोमात उठून उभा राहत असल्याचे या बैठकीत दिसून आले.

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 : उद्धव ठाकरेंची रणनीती सुरू, तेजस्वी घोसाळकर यांच्यावर विश्वास; दहिसरची जबाबदारी सोपवली
मुंबई महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मात्र, या निवडणुकीचं विशेष महत्त्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) साठी आहे. ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची कसोटी देखील ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने एकामागोमाग एक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करून त्यांनी महत्त्वाचा राजकीय संकेत दिला आहे.
नाराजी, आरोप आणि सत्तांतराच्या चर्चांना पूर्णविराम
तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका असून काही महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या. विशेषतः शिवसेनेतून बाहेर पडून भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले. त्यांच्या सासऱ्यांनी आणि ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनीही सार्वजनिक आरोप केला होता की “माझ्यावर आणि माझ्या सूनेवर पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे”. या पार्श्वभूमीवर मुंबई बँकेच्या संचालकपदी भाजपच्या पाठिंब्याने तेजस्वी यांची नियुक्ती झाल्यानं राजकीय भूकंपाच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.
‘मातोश्री’ भेटीनंतर राजकीय स्पष्टता
मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत तेजस्वी घोसाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आपण ठाकरे गटातच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर पक्षाने अधिकृतपणे त्यांची दहिसर विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली. यामागे फक्त संघटनात्मक मजबुती नव्हे, तर राजकीय संदेश देण्याचा हेतूही असल्याचे सांगितले जाते.
दहिसरची जबाबदारी आणि तेजस्वी घोसाळकरांचा स्थानिक प्रभाव
मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघ हा ठाकरे गटासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. येथे मराठी मतदारांची संख्या मोठी आहे आणि शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांचे वर्चस्व आहे. तेजस्वी घोसाळकर यांचा स्थानिक पातळीवर प्रभाव असून त्यांनी नगरसेविका म्हणून केलेले काम, सामाजिक संपर्क, आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेल्याचे स्पष्ट होते.
शिवसेना ठाकरे गटाची नव्याने बांधणी सुरू
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गट आता मुंबईत पुन्हा एकदा आपलं बळ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी महिला नेतृत्व, अनुभवी कार्यकर्ते आणि युवा चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. तेजस्वी घोसाळकर यांची पुनर्नियुक्ती हा त्या धोरणाचाच भाग असल्याचं निरीक्षकांचे मत आहे.
राजकीय संदेश : 'संपर्क तुटलेले नाहीत, नेतृत्व अजूनही मजबूत आहे'
या निर्णयाद्वारे उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नाराज नेत्यांनाही एक अप्रत्यक्ष संदेश दिला आहे – “पक्षात संवाद सुरू आहे, आणि आपल्यावर विश्वास कायम आहे.” तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती ही “संपर्क तुटलेले नाहीत आणि नेतृत्व अजूनही निर्णयक्षम आहे” असा सशक्त राजकीय संदेश देतो.


