- Home
- Mumbai
- CIDCO Homes: मोठी बातमी! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय शक्य
CIDCO Homes: मोठी बातमी! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय शक्य
CIDCO Homes: सिडकोच्या घरांच्या वाढीव दरांवरून निर्माण झालेल्या वादानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत दरकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार?
मुंबई: घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोच्या घरांच्या किमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असताना, सिडकोच्या सोडतधारकांसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिडकोच्या वाढीव दरांवरून निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार असून, यामध्ये सिडको घरांच्या दरांबाबत निर्णायक भूमिका घेण्यात येणार आहे.
नागरिकांचा वाढता असंतोष, शासनाकडून शेवटी हालचाल
‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर (ऑक्टोबर 2024)’ या योजनेअंतर्गत झालेल्या लॉटरीत अनेक नोडमधील घरांच्या उच्च दरांमुळे नागरिक नाराज होते.
योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सोडतधारकांनी अनेक वेळा आंदोलने, मोर्चे आणि निवेदने दिली. सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे नागरिकांचा असंतोष वाढत गेला.
10 जुलै 2025 रोजी विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे आणि विक्रांत पाटील यांनी या विषयावर लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी सिडकोच्या गृहधोरणावर आणि वाढीव दरांवर शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती मात्र त्यावेळी कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता.
फडणवीस-शिंदेंकडून सकारात्मक संकेत
अलीकडेच वाशी येथे झालेल्या स्व. आण्णासाहेब पाटील जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर लवकर बैठक घेण्याचे संकेत दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही “सिडको घरांच्या किमतींबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल,” असे आश्वासन दिले.
शिंदे यांनी यापूर्वी पोलिस गृहनिर्माण योजनेत घरांची किंमत 50 लाखांवरून थेट 15 लाखांपर्यंत कमी करून दाखवली होती. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
RTI मध्ये उघड, सिडको घरांच्या मूळ किमती 30 ते 50% ने कमी
आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या घरांच्या मूळ किंमती सध्याच्या दरांपेक्षा 30 ते 50 टक्क्यांनी कमी असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे आता दरकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
दिवाळीनंतरची भेट ठरणार का?
ही बैठक दिवाळीनंतर सोडतधारकांसाठी आनंदाची भेट ठरू शकते. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या चर्चेला दिशा मिळणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जर दरकपातीचा निर्णय झाला, तर राज्यभरातील लाखो सोडतधारकांना मोठा दिलासा मिळेल आणि अनेकांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल.
राजकीय पार्श्वभूमीवरही महत्त्वपूर्ण बैठक
महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची ठरणार आहे. सरकारने सिडको घरांच्या किमतीत कपात केली, तर नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि ‘घर सबका हक’ हे स्वप्न अनेकांसाठी साकार होऊ शकेल.