मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाच्या मुद्यावर सुनावणी दरम्यान आंदोलकांना दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई: मराठा आंदोलनाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाही. आज, मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत आंदोलकांना आदेशाचे पालन करायला सांगा, अन्यथा आम्हाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी लागेल आणि मनोज जरांगे पाटील यांना जबर दंड लावण्याचाही आदेश आम्हाला द्यावा लागेल, मुंबईकरांना शांतपणे त्यांचे जनजीवन जगू द्या, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना प्रश्न विचारला आहे. त्यानं बोलताना म्हटलं आहे की, केवळ पाच हजार जणांना परवानगी असताना काय काळजी घेतली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आंदोलकांकडे परवानगी नाही, त्यामुळे दोन वाजून 40 मिनिटांपर्यंत तात्काळ जागा रिकामी करा, आम्हाला तीन वाजेपर्यंत सर्वकाही सुरळीत झालेलं हवं, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन आढावा घेऊ,असं कोर्टाने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे.

मराठ्यांचे वकील काय म्हणाले? 

मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आंदोलनकर्त्यांच्या वर्तणुकीबाबत न्यायालयात महत्त्वाचे आश्वासन देण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की, “यापूर्वी पाचशे मोर्चे काढले गेले, पण कधीही अनुशासनभंगाची वेळ आली नाही. पुढेही आंदोलक बेशिस्त वागणार नाहीत, याची पूर्ण हमी आम्ही देतो.” या भूमिकेनंतर खंडपीठाने पुढील सुनावणी दुपारी तीन वाजता घेण्याचा निर्णय घेतला.