Mumbai Mayor Election 2026 : मुंबई महापालिकेतील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने संयुक्त गटाऐवजी स्वतंत्र नोंदणीचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपच्या रणनीतीवर परिणाम होणार असून ठाकरे गटाला राजकीय दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Mumbai Mayor Election 2026 : मुंबई महानगरपालिकेत सत्तेचे समीकरण स्पष्ट झाल्यानंतरही भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. महापौर निवड, स्थायी समिती आणि वैधानिक समित्यांवरील वर्चस्वासाठी सत्ता वाटपावर दोन्ही पक्षांत चर्चा सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेत स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे भाजपच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, विरोधक ठाकरे गटाला दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

संयुक्त गटाची योजना का फसली?

महापालिकेतील विविध वैधानिक समित्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने ‘संयुक्त गट’ म्हणून नोंदणी करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येण्याच्या भीतीमुळे शिंदे सेनेने अखेर स्वतंत्र नोंदणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

स्वतंत्र अस्तित्वाचा धोका ओळखून निर्णय

खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, संयुक्त गटाची नोंदणी झाल्यास पुढील पाच वर्षे शिंदे सेनेला भाजपच्या धोरणांवर अवलंबून राहावे लागले असते. गटनेतृत्व भाजपकडे गेले असते आणि शिंदे सेनेचे स्वतंत्र अस्तित्व कागदोपत्री संपुष्टात आले असते. हाच धोका ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने स्वतंत्र नोंदणीचा पवित्रा घेतला आहे.

स्थायी समितीतील १३–१३ चा पेच

महापालिकेच्या तिजोरीवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्थायी समितीमध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ १३–१३ असे काट्याचे आहे. शिक्षण समिती अध्यक्षांचे मत वगळता कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. संयुक्त नोंदणी केल्यास सत्ताधाऱ्यांना एक अतिरिक्त सदस्य मिळू शकला असता, मात्र त्या बदल्यात पक्षाची स्वायत्तता गमावण्यास शिंदे गट तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधकांना दिलासा, भाजपच्या रणनीतीवर परिणाम

शिंदे गटाच्या स्वतंत्र नोंदणीच्या निर्णयामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा दिलासा मिळणार आहे. विविध समित्यांमध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करू शकतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

नोंदणी एकत्र, पण गट स्वतंत्र

"युती म्हणून आम्ही कोकण भवनला एकत्र जाऊ, मात्र आमची गट नोंदणी स्वतंत्र असेल," असे शिंदे सेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले आहे. सध्याच्या बलाबलानुसार स्थायी समितीवर भाजपचे ८ आणि शिंदे गटाचे ३ सदस्य जाण्याची शक्यता आहे. स्वतंत्र नोंदणीमुळे शिंदे सेनेला आपल्या नगरसेवकांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.