मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज चौथा दिवस आहे. आंदोलकांच्या खाण्यापिण्याच्या हाल होत असल्याने अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून त्यांनी त्यांचं उपोषण कडक केलं आहे. २९ ऑगस्ट रोजी ते लाखो आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. आंदोलकांचे खाण्या पिण्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून अमित ठाकरे यांनी त्यांना मदत करण्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांना अवाहन केलं आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले?
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,
सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, -
जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा.
- औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका.
- त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
- एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे.
लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर केली टीका
मनोज जरांगे राज ठाकरेंबाबत बोलताना म्हणाले होते की, राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, आरक्षण आणि मोर्चाबाबत सर्व उत्तरं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत. मनोज जरांगे का परत आले, मुंबईकरांना होणाऱ्या गैरसोयीबाबत काय उपाययोजना केल्या जात आहेत, हे प्रश्न थेट एकनाथ शिंदेंनीच स्पष्ट करावेत, अशी मागणी ठाकरे यांनी केली. त्यांनी आठवण करून दिली की, यापूर्वी नवी मुंबईतील आंदोलनाच्या वेळी शिंदेंनी प्रश्न सोडवला होता, मग आता हा विषय पुन्हा का उफाळला, हे शिंदेंनी सांगणे गरजेचे आहे.
