आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ च्या निमित्ताने मुंबईत एका भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा यांनी सहभाग घेतला आणि योगासनं केली.

मुंबई | आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ च्या निमित्ताने मुंबईत एक भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा यांनी सहभाग घेतला. त्यांनी उपस्थितांबरोबर योगासनं केली आणि आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश दिला.

मुंबईतील एका सार्वजनिक मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला अनेक योगप्रेमी आणि आरोग्याबाबत जागरूक असलेल्या नागरिकांनी उपस्थिती लावली होती. अमृता फडणवीस यांनी योगदिनाचे महत्त्व पटवून दिले. अभिनेत्री नुसरत भरुचा हिनेही या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि योगा करून दाखवला.

एकत्र येऊन केली योगासने

कार्यक्रमात विविध प्रकारची योगासने, प्राणायाम व ध्यान सत्रे घेण्यात आली. सहभागी नागरिकांना प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने योगाभ्यास करण्याची संधी मिळाली. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. योग दिनाच्या निमित्ताने 'आरोग्य आणि एकता' या संकल्पनेवर भर देण्यात आला. आयोजकांनी सांगितले की, “योग फक्त एक व्यायामप्रकार नसून, तो शरीर, मन आणि आत्म्याला एकत्रित ठेवणारा मार्ग आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मकता आणि एकोप्याची भावना वाढीस लागते.”

या कार्यक्रमातून एक सकारात्मक संदेश दिला गेला की, आपण कोणत्याही वयाचे असलो तरी योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य आणि मानसिक संतुलन राखू शकतो. अमृता फडणवीस आणि नुसरत भरुचा यांच्या सहभागामुळे तरुणाईमध्येही योगाबद्दलची आवड वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

योगासनांचे फायदे 

योगासने केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नाहीत, तर मनाच्या शांततेसाठीही अतिशय प्रभावी आहेत. नियमित योगाभ्यास केल्याने शरीर लवचिक राहते, स्नायूंना बळकटी मिळते आणि श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया सुधारते.

मानसिक आरोग्यासाठीही योग उपयुक्त ठरतो. ध्यान, प्राणायाम यामुळे तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि झोपही सुधारते. विशेषतः "सूर्यनमस्कार", "भुजंगासन", "वज्रासन" यासारखी आसने पचन सुधारण्यात आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात.