Viral video : माणुसकीचे दर्शन घडविणारी एक घटना मुंबई शहरात घडली. एका वृद्ध महिलेला चढता यावे यासाठी मोटरमनने प्लॅटफॉर्मवरून नुकतीच सुटलेली लोकल ट्रेन थांबवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोटरमनला खऱ्या आयुष्यातील हीरो म्हटले जात आहे.
Viral video : मुंबईचे जीवन एवढे धकाधकीचे आहे की, कोणालाच निवांतपणे श्वास घेण्याची फुरसत नसते. प्रत्येकजण धावपळ करत वेळेत कार्यालय गाठतो. त्यानंतर टार्गेटचे गणित सांभाळत कार्यालयीन कामकाज सुरू करतो. वेळ मिळेल तेव्हा जेवतो आणि काम बऱ्यापैकी अवाक्यात आल्यानंतरच कार्यालयातून बाहेर पडतो. अशा बिझी वेळापत्रकाने बांधल्या गेलेल्या मुंबईकरांना दिवसाकाठी कुठेना कुठे तरी, माणुसकीचे चित्र पाहायला मिळते… अन् ते पाहून तो मनोमन सुखवतो.
मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात माणुसकीचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वृद्ध महिलेला सुरक्षितपणे ट्रेनमध्ये चढता यावे यासाठी लोकलच्या मोटरमनने नुकतीच सुटलेली ट्रेन थांबवली… या कृत्याने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. ओम त्रिपाठी नावाच्या व्हिडिओग्राफरने हा व्हिडिओ शूट केला आहे.
ट्रेनला हात दाखवणाऱ्या आजी
व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला काठीच्या साहाय्याने चालत येताना आणि प्लॅटफॉर्मवरून नुकत्याच सुटलेल्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. साधारणपणे, मुंबई लोकल ट्रेन वेळेचे काटेकोरपणे पालन करतात आणि एकदा सुरू झाल्यावर थांबत नाहीत. पण, त्या महिलेची अडचण पाहून मोटरमनने लगेच ट्रेनचा वेग कमी केला आणि गाडी थांबवली. ती महिला सुरक्षितपणे ट्रेनमध्ये चढल्यानंतरच ट्रेन पुढे निघाली. "माणुसकी अजूनही जिवंत आहे" या कॅप्शनसह शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 14 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. "हे फक्त ट्रेन थांबवणे नाही, तर आपल्या माणसांप्रति असलेला स्नेह आजही शिल्लक आहे, याचा पुरावा आहे," असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
खऱ्या आयुष्यातील हीरो
मुंबईसारख्या महानगरात मोटरमनने दाखवलेल्या या संयम आणि करुणेचे अनेक जण कौतुक करत आहेत. एका युझरने या घटनेबद्दल लिहिले आहे: "हे पालघर रेल्वे स्टेशन आहे. जर ती ट्रेन तेव्हा गेली असती, तर पुढचे दोन तास दुसरी कोणतीही ट्रेन नव्हती. त्या मोटरमनबद्दल खूप आदर वाटतो." वेळेचे पालन करण्यापेक्षा प्रवाशांबद्दलची माणुसकी जपणाऱ्या या ड्रायव्हरला सोशल मीडिया युझर्स "खऱ्या आयुष्यातील हीरो" म्हणत आहेत.


