हिंजवडीतील विकासकामांवरून ग्रामस्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. गावात पायाभूत सुविधांचा अभाव असून, केवळ आयटी कंपन्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
पुणे: हिंजवडी परिसरातील विकासकामांच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवडजवळील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात स्थानिक ग्रामस्थांनी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. गावात पायाभूत सुविधांचा अभाव असून, केवळ आयटी कंपन्यांना प्राधान्य दिलं जातं आणि गावकऱ्यांची काम दुर्लक्षित होत आहेत, असा आरोप करण्यात आला.
मूलभूत सुविधांचा अभाव
गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, आयटी उद्योगामुळे परिसराचा विकास झालाय, पण त्याचबरोबर वाहतूक, पाणी, रस्ते, आरोग्य अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्थानिक लोकसंख्येला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक गावांत अजूनही शुद्ध पाण्याचा, सांडपाण्याच्या व्यवस्थेचा, रस्त्यांचा अभाव आहे. यामुळे ग्रामस्थांचा रोष अजित पवारांच्या दौऱ्याच्या वेळी दिसून आला होता.
अजित पवार यांनी गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले. विकासकामांमध्ये स्थानिकांचा सहभाग असावा यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल, असं आश्वासनही दिलं. पवारांनी म्हटलं की, या भागात राज्य सरकारने भरपूर निधी दिला असून, पुढील टप्प्यात कामांचा वेग वाढवला जाईल.
प्रदूषणाकडे लक्ष वेधलं
यावेळी काही गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वर्दळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडेही लक्ष वेधलं. त्यांना वाटतं की, विकासाच्या नावाखाली त्यांच्या जीवनावर परिणाम होत आहे. ते म्हणाले, "विकास हवा आहे, पण आमचा मूळ गाव आणि जीवनमान नष्ट करायला नाही पाहिजे." ग्रामस्थांनी जर लवकर ठोस निर्णय घेतला गेला नाही, तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा परिणाम होऊ शकतो असंही सूचित केलं.
