Uddhav Thackeray Dasara Melava Speech: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोदी, भाजपवर जोरदार टीका केली. सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरवण्यापासून ते मणिपूर हिंसाचार, दुष्काळाच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरले. 

मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) च्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. देशभक्त सोनम वांगचूक यांना पाकिस्तानात परिषदेसाठी गेले म्हणून ‘देशद्रोही’ ठरवले, पण गुपचूप नवाज शरीफच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी कोण? असा घणाघात करत ठाकरे यांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला.

शिवाजी पार्कवर झालेल्या या मेळाव्याला पावसातही लाखो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून टीकेची झोड उठवली.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

सोनम वांगचूकप्रकरणी थेट हल्ला

"देशासाठी योगदान देणाऱ्या सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरवले जाते, कारण त्यांनी लडाखच्या हक्कासाठी आवाज उठवला. पण मोदी गुपचूप पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खातात, त्यांचं काय?"

मणिपूरच्या वेदना ‘मणी’ यांना कधी दिसल्या नाहीत

"मणिपूर तीन वर्षे पेटत होतं, पण मोदी गेलेच नाहीत. आता फक्त नावातील 'मणी' दिसल्याने गेले. पण तिथल्या जनतेच्या डोळ्यातील अश्रू मात्र दिसले नाहीत."

कमळ फुलवण्यासाठी चिखल पसरवला

"भाजपने सत्तेसाठी चिखल पसरवला, कायद्यांचा गैरवापर केला. अनेकांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात डकलं."

मुंबईवरून वार, अदानीचा हवाला

"मुंबई जिंकली तर ती अदानीच्या घशात घालतील. खड्ड्यांनी भरलेल्या मुंबईत भाजप महापौराचा नारा देत आहे."

दुष्काळावर दुटप्पीपणा

"विरोधी पक्षात असताना 'ओला दुष्काळ जाहीर करा' म्हणणारे मुख्यमंत्री आता म्हणतात, दुष्काळ काही नाही. शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता हेक्टरी ₹५०,००० द्यायला हवेत."

ठाकरेंचा सणसणीत शब्दप्रहार

"शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला, पण ते सोनं नव्हतं पितळ होतं. खरं सोनं आजही माझ्याकडे आहे."

"गाढवावर पांढरी शाल टाकली तरी ते वाघ होत नाही. शेवटी गाढव ते गाढवच!"

"कमळाबाई स्वतः फुलवतात, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करतात."

सत्तेचा गैरवापर आणि कायद्यांचा दुरुपयोग

उद्धव ठाकरे यांनी राज्यात जनसुरक्षा कायद्याचा वापर करून निष्पाप लोकांना त्रास दिला जात असल्याची टीका केली. सोनम वांगचूक यांच्यावर रासुका लावण्याच्या निर्णयावरही त्यांनी जोरदार आक्षेप घेतला.

संघ आणि गांधी जयंती

"संघाला १०० वर्षे झाली आणि नेमकी गांधी जयंतीच होती हा योगायोग मानायचा की इशारा?"

उद्धव ठाकरेंच्या या दसरा मेळाव्यातील भाषणात आक्रमकतेसह स्पष्टपणा होता. त्यांनी भाजपच्या धोरणांवर आणि मोदींच्या व्यक्तिमत्त्वावर उघडपणे प्रश्न उपस्थित केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी उपहासात्मक भाषेत निशाणा साधला.