Uddhav Thackeray Vidhan Sabha PC News : भाजप नेत्यांच्या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना “मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे मारेकरी” म्हणत प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे भाजपमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

मुंबई : भाजप नेत्यांनी केलेल्या तीव्र टीकेनंतर, उद्धव ठाकरे यांनीही भाजपावर खरपूस हल्ला चढवत, त्यांना “मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे मारेकरी” म्हणत स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिलं. “हिंदूंनाही वाचवू शकत नाहीत आणि आमच्यावर टीका करतायत ही लाजिरवाणी गोष्ट आहे”, अशा घणाघाती शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या राजकारणावर आघात केला.

"भाजपाची बुडाला आग लागली आहे!"

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर भाजपात गोंधळ निर्माण झाल्याचं म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही एकत्र आलो म्हणून त्यांच्या बुडाला आग लागली आहे. ती आग न दाखवता येतेय, ना क्षमवता येतेय मग टीका काय दुसरी करणार?"

"रुदाली हा शब्दसुद्धा हिंदी आहे!"

"मराठी माणसाच्या आनंदावर रुदाली करणारे हे विकृत आणि हिणकस लोक आहेत. रुदाली हा शब्दसुद्धा हिंदी आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भाषा मला समजते!" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला बोचरी आठवण करून दिली.

"आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला नक्कीच आहे"

"मराठी ही राज्यभाषा आहे आणि तिचं जतन करणं आमचं कर्तव्य आहे. मात्र, इथे जाणीवपूर्वक भाषिक वाद उभे केले जात आहेत. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. भाषेच्या सक्तीला विरोध आहे", असं स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी संवादातून संतुलन साधण्याचा प्रयत्न केला.

"भाजपचा मूळ पक्ष मेला आहे, हे लोक केवळ राजकीय शवयात्रा काढत आहेत"

"मूळ भाजप हा पक्ष आता उरलेला नाही. शिवसेनेसोबत युती करणारा भाजप संपला आहे. आता ते उर बडवायला बाहेरचे लोक आणत आहेत. आज जे बोलत आहेत, त्यांचा भाजपाशी फारसा संबंधच नाही", असा आरोप ठाकरे यांनी केला.

"पहलगामचे अतिरेकी भाजपात गेले का?"

भाजपच्या निशिकांत दुबे आणि इतर नेत्यांनी मराठी आंदोलकांच्या तुलनेत केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. "पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी भाजपात गेले का? मिळत नाहीत का? आणि तुम्ही त्यांची बाजू घेत आहात? ही माणसं हिंदूंनाही वाचवू शकत नाहीत आणि मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे."

भाजपाच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जितक्या आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे, त्यावरून हे स्पष्ट होतं की राजकीय रणधुमाळी आता व्यक्तिगत सन्मानाच्या पातळीवर पोहोचली आहे. मराठी अस्मिता, भाषिक असंतोष आणि राजकीय मतभेद या सर्व घटकांचा विस्फोट विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होतो आहे.