अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील गुटखा माफियांविरोधात कठोर भूमिका घेत थेट मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.

Mumbai : राज्यातील भेसळखोर, गुटखा माफिया आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करत गुटखा माफियांना थेट मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाईचा इशारा दिला. याचबरोबर रुग्णालयांमधील औषध खरेदीबाबत रुग्णांच्या अधिकारांचे संरक्षण करणारा निर्णयही त्यांनी जाहीर केला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

गुटखा माफियांविरोधात थेट मकोकाची कारवाई

राज्यात गुटखा, तंबाखू आणि आरोग्यास घातक पदार्थांवर बंदी असतानाही उत्पादन, साठवणूक आणि वितरणाचे प्रकार सुरूच असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर गुटखा माफियांविरोधात केवळ नियमित कारवाई न करता संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा अर्थात मकोका लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

व्हायरल धमकीच्या क्लिपवर मुंढेंचे स्पष्टीकरण

पत्रकार परिषदेदरम्यान तुकाराम मुंढे यांना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित धमकीच्या व्हिडिओबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोणतीही धमकी मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित क्लिप ही सध्याची नसून जवळपास दहा वर्षांपूर्वीची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

FDA अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत कठोर भूमिका

अलीकडेच कारवाईसाठी गेलेल्या FDA अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेबाबतही मुंढे यांनी कठोर भूमिका मांडली. या प्रकरणात आठ जणांना तातडीने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिस महासंचालकांशी चर्चा करून त्वरित कारवाई करण्यात आल्याचे सांगत, कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांना नियमपालनाचे आवाहन

राज्यातील दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबतही FDA गंभीर असल्याचे दिसून आले. डेअरी उद्योगातील उत्पादक आणि मालकांसोबत बैठक घेऊन उत्पादनापासून वितरणापर्यंत अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दूध संकलन केंद्रांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता आणि स्वच्छतेची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. उद्योग प्रतिनिधींनीही नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुंढे यांनी दिली.

रुग्णांसाठी दिलासा; औषध खरेदीवर सक्ती नाही

रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना त्याच रुग्णालयाच्या मेडिकलमधून औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार येत होत्या. यावर स्पष्ट भूमिका घेत मुंढे यांनी सांगितले की, कायद्यानुसार रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. रुग्णालय प्रशासनाने विशिष्ट दुकानातूनच औषधे घेण्याचा दबाव टाकल्यास त्याविरोधात कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

YouTube video player