भिवंडीत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा प्रकार उघड झाला आहे. 

Mumbai : राज्यात अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धाडसत्रांमुळे भेसळ, बनावट अन्न आणि अस्वच्छ खाद्य व्यवसायांवर दबाव वाढला आहे. मात्र याच वातावरणाचा गैरफायदा घेत काही जणांनी स्वतःला FDA अधिकारी म्हणून सादर करत व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे. भिवंडीत उघडकीस आलेला प्रकार हा अशाच तोतया टोळीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

शांतीनगर परिसरातील व्यापारी लक्ष्य

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून ही टोळी शांतीनगरमधील हॉटेल्स, खानावळी आणि घाऊक विक्रेत्यांकडे जाऊन स्वतःला FDAचे अधिकारी म्हणून ओळख देत होती. “शिळे, अस्वच्छ आणि नियमबाह्य अन्नपदार्थ विक्री होत आहेत” असे सांगून कारवाईची भीती दाखवली जात होती. त्यानंतर प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

‘कारवाई’चा धाक दाखवून पैसे उकळल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, टोळीतील सदस्य दुकानदारांना शिळे आणि घाणेरडे अन्न विक्री केल्याचा आरोप करत आणि “तपासणी”, “नमुने”, “सील” अशा शब्दांचा वापर करून दबाव आणत होते. त्यानंतर कथित समेटाच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचे सांगितले जाते.

सोंग उघड कसे पडले?

घाऊक दुकानात पोहोचलेल्या संशयितांनी कोणती अधिकृत कागदपत्रे दाखवली नाहीत, तसेच त्यांच्या वागण्यात विसंगती आढळल्याने स्थानिकांना संशय आला. काही व्यापाऱ्यांनी परस्पर संपर्क साधून माहिती पडताळण्याचा प्रयत्न केला. यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवले आणि कथित टोळीचा डाव उधळला गेला.

पोलिस तपासाची दिशा

पोलिसांनी संबंधित महिलां व पुरुषाची चौकशी सुरू केली असून त्यांनी इतर व्यापाऱ्यांकडून पैसे उकळले का, याचा तपास सुरू आहे. त्यांनी कोणत्या नावाने ओळखपत्रे वापरली, कोणत्या वाहनातून फिरत होते आणि इतर ठिकाणीही अशाच पद्धतीने वसुली झाली का, याबाबत माहिती गोळा केली जात आहे.