धबधबे, धरणे आणि नद्यांच्या परिसरात दुचाकी, त्रिचाकी आणि चारचाकी वाहनांचा प्रवेश बंदीस्त आहे, केवळ आपत्कालीन व अत्यावश्यक सेवांसाठीच परवानगी दिली जाईल.
पुणे : पावसाळ्यात पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने लोणावळा आणि मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र दुडी यांनी जारी केला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरही बंदी घालण्यात आली आहे. ती १९ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे.
कोणत्या ठिकाणी बंदी?
हा आदेश पुढील पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आला आहे:
- एकविरा देवी मंदिर
- कार्ला आणि भाजे लेणी
- भाजे धबधबा
- लोणावळा, विसापूर आणि तिकोना किल्ले
- टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट
- पवना धरण आणि परिसर
काय बंदी घालण्यात आली आहे?
प्रशासनाच्या आदेशानुसार खालील सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे:
- वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे
- धबधब्याखाली बसणे
- कड्याच्या टोकावर, घसरड्या वळणांवर किंवा धोकादायक जागांवर सेल्फी किंवा चित्रीकरण
- मद्यप्राशन किंवा नशेत प्रतिबंधित स्थळी प्रवेश
- बेफिकीर वाहन चालवणे, धोकादायक ओव्हरटेक करणे
- अपुर्या सुरक्षिततेच्या ठिकाणी वाहन उभे करणे
- अश्लील भाषा किंवा हावभाव करणे
- मोठ्या आवाजात संगीत वाजवणे (DJ सहित)
- ध्वनी, जल किंवा वायू प्रदूषण करणाऱ्या कृती
वाहतुकीसाठी विशेष आदेश
धबधबे, धरणे आणि नद्यांच्या परिसरात दुचाकी, त्रिचाकी आणि चारचाकी वाहनांचा प्रवेश बंदीस्त आहे, केवळ आपत्कालीन व अत्यावश्यक सेवांसाठीच परवानगी दिली जाईल. वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी तात्पुरते मार्ग वळविण्याचे आदेशही मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत जारी करण्यात आले आहेत.
कायदेशीर कारवाईची तरतूद
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, गट किंवा संस्थांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ नुसार कठोर कारवाई केली जाईल.
सातारा जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत बंदी
सातारा : जिल्ह्यात जोरदार पावसाची संततधार सुरू असताना, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने २० जूनपासून १९ ऑगस्टपर्यंत अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळांवर कडक निर्बंध लागू केले आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा आदेश जारी करण्यात आला असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात त्या नैसर्गिक स्थळांवर या आदेशाचा प्रभाव असणार आहे.
प्रभावित स्थळांमध्ये कोणकोणती ठिकाणे?
या आदेशाअंतर्गत पुढील पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू केले आहेत:
- कास पुष्प पठार
- थोसेघर धबधबा, वज्राई धबधबा
- महाबळेश्वरमधील लिंगमाळ धबधबा
- अजिंक्यतारा किल्ला
- तसेच सातारा, महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील इतर धबधबे, तलाव, आणि धरण परिसर
काय काय बंदी घालण्यात आली आहे?
- वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरू नये किंवा पोहण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
- धबधब्याखाली थेट बसणे किंवा पाण्याच्या प्रवाहात फोटो-सेल्फी काढणे धोकादायक आहे आणि त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
- दुर्गम कड्यांवर, अरुंद घाटरस्त्यांवर, धबधब्यांच्या पायथ्याशी सेल्फी किंवा चित्रीकरण करणे बंदीस्त करण्यात आले आहे.
- मद्यप्राशन आणि मद्यधुंद अवस्थेत प्रतिबंधित परिसरात प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अनुचित वर्तन, विशेषतः महिलांशी गैरवर्तनास कठोर शिक्षा करण्यात येईल.
- डिजे किंवा मोठ्या आवाजातील संगीत वाजवणे बंदीस्त असून, सार्वजनिक शांततेस बाधा आणणाऱ्या कोणत्याही गोष्टींवर कारवाई होणार आहे.
- वाहने रस्त्यात अडवणे, अरुंद घाटांमध्ये थांबवणे अथवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणेही गुन्हा मानला जाणार आहे.
आदेशाचे कारण काय?
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी पावसाळ्यात प्रचंड गर्दी होत असून, पाण्याचे स्तर वाढल्याने आणि परिसरात भूस्खलन, घसरणाऱ्या मातीच्या कड्यांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
पर्यटकांना प्रशासनाची विनंती
जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना सहकार्याची विनंती केली असून, "पावसाळ्याच्या काळात अत्यावश्यक नसल्यास या ठिकाणी जाणे टाळावे," असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि वन विभाग यांच्यासोबत समन्वय साधून ही कारवाई करण्यात येणार आहे.
साताऱ्यात निसर्ग सौंदर्य जितकं अप्रतिम आहे, तितकाच पावसाळ्यात धोका वाढतो. पर्यटन करताना सुरक्षिततेचा विचार करा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.


