आजपासून 'नौतपा' कालावधीला सुरुवात झाली असून, पुढील नऊ दिवस राज्यात तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने तापमान ४० ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली असून, नागरिकांना उष्माघातापासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या ‘नौतपा’ कालखंडाला आजपासून सुरुवात झाली असून पुढील नऊ दिवस राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये प्रचंड उष्णतेची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने काही भागांमध्ये उष्णतेची लाट आणि गरम वाऱ्यांचा इशारा दिला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

तापमान किती वाढणार? 

नौतपा हा काळ साधारणपणे २५ मे ते २ जूनदरम्यान मानला जातो. पारंपरिक मान्यतेनुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर या कालावधीची सुरुवात होते. याच काळात सूर्यकिरणांची तीव्रता अधिक वाढते आणि वातावरणातील उष्णता उच्चांक गाठते, असे मानले जाते. हवामान तज्ज्ञांच्या मते, प्री-मान्सून काळात जमिनीचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. त्यात कोरडे वातावरण, कमी आर्द्रता आणि सतत वाहणारे गरम वारे यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवते. काही भागांमध्ये तापमान ४० ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काय लक्षण दिसली? 

या काळात उष्माघात, डिहायड्रेशन, थकवा आणि चक्कर येणे यांसारख्या समस्या वाढू शकतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दुपारी ११ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, ताक, नारळपाणी, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ घेणे तसेच हलका आणि पचायला सोपा आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, पारंपरिक समजुतीनुसार नौतप्यात जितकी अधिक उष्णता पडते, तितका मान्सून चांगला होण्याची शक्यता मानली जाते. मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते, उष्णतेमागे वैज्ञानिक कारणे असून प्री-मान्सून वातावरणीय बदलांमुळे हा कालावधी अधिक तापदायक ठरतो.