पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याविरोधात सोशल मीडियावर AI-जनरेटेड आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ व फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणात आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटनेत पंतप्रधान मोदी आणि पीयूष गोयल यांचे सोशल मीडियावर कथितरित्या AI-जनरेटेड (Artificial Intelligence) आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ- फोटो पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून संबंधित सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली जात आहे.

भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची तक्रार

ही कारवाई भाजप महिला मोर्चा, महाराष्ट्रच्या राज्य सोशल मीडिया सहसंयोजक बीना गोगरी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. तक्रारीत सोशल मीडियावरील संबंधित पोस्टद्वारे दिशाभूल करणारी माहिती पसरवणे, सार्वजनिक असंतोष निर्माण करणे आणि घटनात्मक पदांवरील व्यक्तींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विद्यार्थी आंदोलनादरम्यान समोर आले व्हिडिओ

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन सुरू होते. याचवेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉर्फ केलेले फोटो आणि AI-जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे 'कॉकरोच जनता पार्टी'बाबत आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचा एक व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता. नंतर या व्हिडिओमध्ये छेडछाड (Doctored) करून तयार केल्याचे समोर आले.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंची चौकशी

तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र सायबर विभागाने एफआयआर (FIR) नोंदवून संबंधित फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट्सविरोधात तपास सुरू केला आहे. हे व्हिडिओ आणि फोटो प्रथम कोणी तयार केली, ती सोशल मीडियावर कोणी पोस्ट केली, याचा शोध सायबर पोलिस घेत आहेत.

AI च्या गैरवापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा (AI) गैरवापर करून बनावट व्हिडिओ आणि फोटो तयार करण्याच्या वाढत्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. अशा गोष्टींमुळे दिशाभूल होण्याचा आणि सामाजिक तणाव वाढण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.